तसेच, मराठवाडा व विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, कोल्हापूर व नाशिक घाटमाथ्यालाही याच यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
साताऱ्यात अतिवृष्टी, ब्रह्मपुरीत तापमान उच्चांकी
18 जूनच्या सकाळपर्यंतच्या 24 तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 37 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे, साताऱ्यातील कोयना परिसरात तब्बल 130 मिमी पावसाची नोंद झाली, जी राज्यातील सर्वाधिक ठरली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा मंदावलेला असला तरी काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस कायम आहे.
advertisement
कमी दाबाचे दोन क्षेत्र सक्रिय
गुजरात व परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानकडे सरकले आहे. पश्चिम बंगाल आणि लगतच्या भागात तयार झालेले दुसरे कमी दाबाचे क्षेत्र आता झारखंडच्या दिशेने सरकत आहे. या प्रणालीमुळे गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व भारतात ढगांच्या घनतेत वाढ झाली आहे. परिणामी, पुढील काही दिवस पावसाला पोषक हवामान राहणार असल्याचे संकेत आहेत.
मान्सूनची घोडदौड सुरूच
नैकृत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा वेग घेतला आहे. बुधवारी (18 जून) मॉन्सूनने संपूर्ण गुजरात, छत्तीसगड, झारखंड, तसेच मध्य प्रदेश, बिहारचा आणखी काही भाग, राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काही भाग व्यापले आहेत. येत्या दोन दिवसांत मॉन्सून आणखी प्रगती करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
