पुणे : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. तर दुसरीकडे तरुण नशेच्या आहारी जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच नशेसाठी चोरी करणााऱ्या २ तरुणांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही तरुण नशेसाठी आणि मौजमजेसाठी फक्त यामाहा RX 100 बाईक चोरी करत होते. पोलिसांनी या तरुणांकडून तब्बल १० गाड्या जप्त केल्या आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर आणि चंदननगर भागामध्ये मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तपास सुरू केला असता दोन तरुणांना अटक करण्यात आली. हे दोन्ही तरुण रेकॉर्डवरील गुन्हेगार होते. पवन तानाजी माने (वय २२) आणि प्रतिक शिवाजी अस्वरे (वय २०) असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी आणखी २ जणांचा शोध सुरू आहे. हडपसर, दिघी, चंदननगर पोलीस ठाण्यात या आरोपींच्या विरोधात याआधी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. नशा आणि मौजमजा करण्यासाठी हे दोघे दुचाकींची चोरी करत होते.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २ तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल १० चोरीच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या १० पैकी काही गाड्या यामाहा कंपनीच्या आहेत. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली असता त्या दोघांसोबत आणखी दोघं जणं मिळून फक्त यामाहा कंपनीच्या गाड्या चोरी करत असल्याची कबुली दिली. यामाहा RX100, यामाहा RX135 या दोन्ही गाड्या बंद झाल्या आहेत. पण, दमदार इंजिन आणि चांगली पॉवर असल्यामुळे या दोन्ही बाईकची वाहन प्रेमींमध्ये चांगली क्रेझ आहे. हवी ती किंमत देऊन या बाईकची आजही विक्री होत आहे.
त्यामुळेच यामाहा कंपनीच्या दुचाकी आता बाजारात मिळत नसल्यानं ते हडपसर, चंदननगर भागात यामाहा कंपनीच्या दुचाकींवर लक्ष ठेवून त्या चोरी करत असे. तसंच यातील काही तरुण या दुचाकींचा वापर नशा करायला जाण्यासाठी सुद्धा वापरत होते. या चोरांकडून आणखी बाईक जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
