भारतात सर्वात सुरक्षित कार कोणती कंपनी बनवते, या प्रश्नाचे एक उत्तर आहे आणि ते म्हणजे टाटा मोटर्स. इलेक्ट्रिक वाहनं असो अथवा इंटर्नल कम्बशन इंजिन अर्थात आयसीई मॉडेल्स, टाटा कारमध्ये सर्वोत्तम सुरक्षा मानके पाहायला मिळतात. ग्लोबल एनसीएपीमध्ये या वाहनांनी मिळवलेल्या सेफ्टी रेटिंगमुळे हे सिद्ध झाले आहे. तसेच कंपनीच्या कार मॉडेल्सनी भारतीय एनसीएपीमध्ये देखील लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. आता टाटा पंच ईव्ही या कंपनीच्या सर्वात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक एसयूव्हीला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
advertisement
नेक्सॉन ईव्ही, हॅरियर आणि सफारी या तीन एसयूव्हींना 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेले असून, त्यात आता पंच ईव्ही या चौथ्या मॉडेलचा समावेश झाला आहे. याचा अर्थ टाटाच्या चार एसयूव्हींना आत्तापर्यंत 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. टाटा पंच ईव्ही, टाटा नेक्सॉन ईव्ही, टाटा हॅरियर आणि टाटा सफारीने अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन आणि चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन अशा दोन्ही श्रेणींमध्ये 5 स्टार रेटिंग मिळवलं आहे. विशेष बाब म्हणजे, या चारही एसयूव्ही कारने 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवलं असलं तरी गुणांच्या बाबतीत टाटा पंच ईव्ही ही नेक्सॉन ईव्ही, हॅरियर आणि सफारीच्या तुलनेत सरस ठरली आहे.
टाटा पंचची किंमत 10.99 लाख रुपये ते 15.49 लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम) आहे. मार्केटमध्ये या कारला थेट प्रतिस्पर्धी सध्या नाही. टाटा पंच ईव्हीच्या स्टँडर्ड व्हॅरियंटमध्ये 60Kw मोटर (114Nm), 25Kwh बॅटरी पॅक देण्यात आले असून, ही कार 315KM रेंज (एमआयडीसी) देते असा दावा करण्यात आला आहे. तसेच लाँग रेंज व्हॅरियंटमध्ये 90kW मोटर (190 Nm), 35kwh बॅटरी पॅक देण्यात आले असून, ही कार 421Km रेंज (एमआयडीसी) असा दावा केला गेला आहे. सेफ्टी रेटिंगचा विचार करता, पंच ईव्हीला अॅडल्ट सेफ्टी श्रेणीत 32 पैकी 31.46 पॉईंट मिळाले आहेत. दुसरीकडे सफारी आणि हॅरियरला या श्रेणीत प्रत्येकी 30.08 पॉईंट मिळाले आहेत. नेक्सॉन ईव्हीला या श्रेणीत 29.86 पॉईंट मिळाले आहेत. चाईल्ड सेफ्टी श्रेणीत, पंच ईव्हीला 49 पैकी 45 पॉईंट मिळाले आहेत. त्या तुलनेत नेक्सॉन ईव्हीला 44.95 पॉईंट तर सफारी आणि हॅरियरला प्रत्येकी 44.54 पॉईंट मिळाले आहेत.
