अलख पांडे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करतात. दर वर्षी अनेक विद्यार्थी IIT-JEE, CAT आणि UPSC यांसारख्या परीक्षा देतात. परंतु प्रत्येक जण या कठीण परीक्षांमध्ये यशस्वी होतात असं नाही; मात्र त्याचा अर्थ अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी फार हुशार नसतात किंवा ते या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊ शकत नाहीत असं नसतं. अलख पांडे हे अशाच एका विद्यार्थ्यांपैकी एक आहेत, ज्यांनी विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
advertisement
अलख पांडे मूळचे अलाहाबादचे आहेत. त्यांचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा आहे. त्यांचं बालपण खूप गरिबीत गेलं. त्यांनी कठोर परिश्रम करून परिस्थितीवर मात केली. अभिनेता बनण्याची इच्छा असूनही, आर्थिक अडचणींमुळे अलख पांडे यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी आठवीत असताना ट्यूशन घ्यायला सुरुवात केली. अलख आणि त्यांच्या बहिणीच्या शिक्षणाच्या खर्चासाठी त्यांच्या आई-वडिलांनी घर विकलं. पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांनी इयत्ता दहावीमध्ये 91% आणि बारावीमध्ये 93.5% गुण मिळवले.
प्रतिष्ठित आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याची अलख यांची इच्छा होती; पण ते प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. मग त्यांनी कानपूरच्या हरकोर्ट बटलर टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून पुढचं शिक्षण घेतलं; पण त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं. कोविड-19 साथीमध्ये, पांडे यांनी उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्या खोलीतून यूट्यूबवर शैक्षणिक व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आणि त्यांना फिजिक्सवाला ही कंपनी सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. ही कंपनी आता भारताची 101वी युनिकॉर्न म्हणून ओळखली जाते.
अलख पांडेचं यश ऑनलाइन शिक्षणाच्या पलीकडचं आहे. 100 टेक्निकल प्रोफेशनल व 500हून अधिक शिक्षकांना कामावर ठेवण्यासाठी त्यांनी आपला बिझनेस वाढवला. रिपोर्ट्सनुसार, यू-ट्यूबवर 100 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्ससह त्यांच्याकडे 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. पांडे यांनी कठीण परिस्थितीवर मात करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळवलं, ते अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. स्वतःसाठी खूप मोठी संपत्ती कमावणारे अलख हे एके काळी ट्यूशनचे पैसे भरण्यासाठी संघर्ष करत होते. आता ते हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आकांक्षा पूर्ण करण्यात मदत करत आहेत.
