मुजफ्फरपुर : आयुष्यात काही करण्याची जिद्द असेल, तर कितीही अडचणी आल्या, कितीही संकटं आली, तरी व्यक्ती त्यातून मार्ग काढतो आणि आपल्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करतो, हे एका व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. बालपणीच डोळ्यांची दृष्टी गमावलेला हा तरुण आज सरकारी शिक्षक झाला आहे. जाणून घेऊयात, ही प्रेरणादायी कहाणी.
रोहित महतो असे या तरुणाचे नाव आहे. रोहित हा लहानपणापासून दृष्टिहीन आहे. मात्र, तरीसुद्धा त्याने आयुष्यात हार मानली नाही. यामुळेच दृष्टिहीन असूनही रोहितने बीपीएससी शिक्षक भरती परीक्षेत यश मिळविले. नुकताच तो बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यातील माडवण हायस्कूलमध्ये रुजू झाला आहे. याठिकाणी तो विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र हा विषय शिकवणार आहे.
advertisement
मुजफ्फरपुरच्या सिकंदरपुर येथील रहिवासी असलेला रोहित हा अत्यंत साधारण कुटुंबातून येतो. मात्र, तरीही त्याने जिद्द सोडली नाही आणि आता त्याला बीपीएससी परीक्षेत पास झाल्यानंतर शुक्रवारी नियुक्तीपत्र मिळाले. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर रोहित हा भावूक झालेला पाहायला मिळाला. एकेकाळी आपल्या वडिलांच्या सहाय्याने कुठेही जायचा. आता त्याला सरकारी शिक्षकाची नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या घरात आनंदाचे वातावर आहे.
लोकल18 सोबत बोलताना त्याने आपल्या यशाचे श्रेय हे आपले आई-वडील आणि भाऊ-बहिणीला दिले. त्याने सांगितले की तो पाहू शकत नाही. पण आता लेक्चरच्या माध्यमातून मुलांना सामाजिक शास्त्र विषय शिकवणार आहोत. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्याने सांगितले.
वयाच्या चौथ्या वर्षी गेली दृष्टी -
रोहितचे वडील राजनाथ महतो यांनी सांगितले की, तो चार वर्षांचा असताना त्याची दृष्टी गेली. त्यांच्या परिस्थितीनुसार, अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊनही त्याचा डोळा बरा झाला नाही. मात्र, असे असूनही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. मुलगा जिद्दीने अभ्यास करत होता, त्यामुळेच आज तो शिक्षक झाला, असे ते म्हणाले. रोहितच्या वडिलांचा त्याच्या शिक्षणाला पूर्ण पाठिंबा होता. आज मुलगा शिक्षक झाल्यानंतर ते खूप आनंदी आहेत. रोहितला कुठेही जावं लागलं की त्याचे वडील त्याच्या सोबत असतात. आता मडवन हायस्कूलमध्ये शिकवायला जाईल तेव्हा त्याचे वडील त्याच्या सोबत असतील, असेही त्यांनी सांगितले.