हरियाणा बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनचे अध्यक्ष डॉ.व्ही. पी. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मार्च 2025 मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांचे मार्किंग एआयच्या माध्यमातून केलं जाईल. नवीन सिस्टिममध्ये उत्तरपत्रिकेत लिहिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे सॉफ्टवेअर सांगेल. त्या आधारे गुणही दिले जातील. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन एआयद्वारे केले जाईल आणि शिक्षक त्याची तपासणी देखील करतील. यानंतर दोन्हीमधील मार्किंगची तुलना केली जाईल.
advertisement
अशी तपासली जाईल उत्तरपत्रिका
या सिस्टिममध्ये परीक्षेनंतर उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जातील. सर्व जिल्ह्यांतील शिक्षकांची पथके विषयनिहाय हे काम पूर्ण करतील. त्यानंतर ऑनलाइन मार्किंग होईल. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लेखी उत्तरांना गुण दिले जातील. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम वेळेत पूर्ण होईल. ऑनलाइन मार्किंगसाठी शिक्षकांकडे यूजर आयडी आणि पासवर्ड असेल, त्याद्वारे ते मूल्यमापन केंद्रावर उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासतील. उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन केव्हा सुरू झाले व कधी बंद झाले, याचीही नोंद केली जाणार आहे. तसेच उत्तरपत्रिका तपासल्यानंतर प्रत्येक प्रश्नाच्या एकूण गुणांचीही आपोआप नोंद होईल. या यात उत्तरपत्रिकेचं एखादं पान तपासायचं राहिलं, तर शिक्षकाला तत्काळ इंडिकेशन दिले जाईल.
2023-24 मध्येच केलं जाणार होतं ऑनलाइन मूल्यांकन
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांसाठी ऑनलाइन मूल्यांकन सिस्टिम मार्च 2023-24 मध्येच पूर्ण होणार होती, जी काही कारणांमुळे होऊ शकली नाही. यानंतर कंपार्टमेंट परीक्षांचे मूल्यांकन ऑनलाइन केले गेले. ज्याचा निकाल अवघ्या दहा दिवसांत जाहीर झाला. आता बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठीही ही सिस्टिम वापरण्याचे नियोजन आहे. त्यामुळे गुण देताना शिक्षकांच्या होणाऱ्या मनमानीला देखील आळा बसेल. अनेकदा उत्तरपत्रिका तपासताना हलगर्जीपणा केल्याचा आरोपही शिक्षकांवर होतो. मात्र एआयद्वारे उत्तरपत्रिका तपासल्यानंतर शिक्षकांनी दिलेले गुण योग्य आहेत की नाही, हे देखील सॉफ्टवेअर ठरवू शकणार आहे.
