मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूतल्या आयबीसी नॉलेज पार्क इथलं मुख्यालय वगळता देशभरातली सर्व कार्यालयं बंद करण्याचा निर्णय बायजू कंपनीने घेतला आहे. पुढच्या आदेशापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. यामुळे कंपनीचे बरेच पैसे वाचण्यास मदत होईल. बायजूची ट्युशन सेंटर्स मात्र सुरू राहतील.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर (2023) महिन्याच्या सुरुवातीला बायजूने कंपनीतल्या 2500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. कर्मचारी कपात करूनदेखील कंपनीच्या आर्थिक स्थितीमध्ये विशेष बदल झालेला नाही.
advertisement
बायजूच्या संस्थापकांची ग्वाही
त्यापूर्वी, बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ग्वाही दिली होती, की 10 मार्चपर्यंत त्यांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार दिला जाईल; मात्र पगार देण्यात कंपनीला अपयश आलं. कंपनीने रविवारी दावा केला होता, की त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण पगारापैकी अर्ध्या रकमेचं पेमेंट केलं आहे. कंपनी व्यवस्थापनाने थकित पगार देण्यासाठी आणखी मुदत मागणारं पत्र कर्मचाऱ्यांना दिलं होतं.
संस्था का बुडाली?
बायजू रवींद्रन आणि काही भागधारकांमध्ये कंपनीच्या नवीन बोर्ड स्थापनेबाबत वाद सुरू आहे. हे प्रकरण कोर्टातही गेलं आहे. त्यामुळे राइट्स इश्यूमधून मिळालेल्या पैशांचा वापर करण्यास न्यायालयाने सध्या बंदी घातली आहे. काही काळापूर्वी भागधारकांनी एका बैठकीमध्ये बायजू रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबीयांना कंपनीच्या बोर्डातून काढून टाकण्यास मंजुरी दिली होती. रवींद्रन यांनी ही बैठक बेकायदा ठरवली होती.
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) 27 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात म्हटलं होतं, की कंपनीला राइट्स इश्यूमधून मिळालेले पैसे एस्क्रो अकाउंटमध्ये ठेवावे लागतील. कंपनी मॅनेजमेंट आणि चार मोठ्या गुंतवणूकदारांमधला वाद मिटल्याशिवाय हे पैसे वापरता येणार नाहीत.
