कोटा : सध्या परिक्षेचा काळ सुरू आहे. परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थी हे तणावात असतात. परीक्षेमुळे अभ्यासाचा ताण तसेच पालकांचाही काही ठिकाणी दबाव पाहायला मिळतो. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे तणावात येतात. यातूनच काही वेळा धक्कादायक घटना समोर येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त कसे राहावे, यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनीच सल्ला दिला आहे.
‘कामयाब कोटा’ अभियानाच्या अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. रविंद्र गोस्वामी यांनी राजीव गांधी नगर येथील बी एल रेसिडेंसीमध्ये कोचिंगच्या विद्यार्थ्यांसोबत रात्री जेवण करत संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे शंकांचे निरसन केले. तसेच त्यांना यशाचा मंत्रही दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जीवनाची दशा आणि दिशा केवळ परीक्षेतील गुण ठरवत नाहीत, यापलीकडे विचार कर जीवनात काहीतरी मोठे करा, असा महत्त्वाचा सल्ला दिला.
advertisement
समस्यांचा धैर्याने सामना करा -
जिल्हाधिकारी डॉ. रविंद्र गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तुमच्या स्वतःच्या कमतरता आणि सामर्थ्य ओळखा आणि समस्यांना आव्हाने म्हणून स्विकारा. अभ्यासातील एकसुरीपणा दूर करण्यासाठी, नेहमी कुटुंब आणि मित्रांशी संपर्क ठेवा. मोबाईलचा वापर कमी करा, असा सल्लाही त्यांनी दिला. जास्तीत जास्त सराव करा, उजळणी करा आणि जुन्या चुका पुन्हा करू नका, असेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.
पुढे ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याची आपली एक क्षमता असते. त्यानुसार आपले स्वप्न आणि ध्येय निश्चित करावे. आयुष्यातील हा क्षण म्हणजे एक टप्पा आहे, तुमचे ध्येय नाही. त्यामुळे आयुष्यात नेहमी काहीतरी मिळवण्याची जिद्द ठेवावी. आपल्या ध्येयासाठी समर्पित व्हा. मात्र, त्याचा परिणाम हा देवावर सोडून द्या. यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यास, जीवनातील उद्दिष्टे आणि जीवनातील आव्हाने, पालकांच्या अपेक्षा याबाबत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जिल्हाधिकाऱ्यांनी सोप्या पद्धतीने दिली.
विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे स्वागत करून आभार मानले. यावेळी वसतिगृहाच्या नोडल अधिकारी सुनीता डागा, कोटा वसतिगृह संघटनेचे अध्यक्ष नवीन मित्तल, सरचिटणीस पंकज, वसतिगृह संचालक उषा यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.