advertisement
या मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक होती की, कुणालाही दया येईल. मात्र, तरीसुद्धा त्याने आपली हिंमत खचू दिली नाही. सुदीप असे या मुलाचे नाव आहे. धैर्य ठेवत मेहनत केली आणि आज त्याचाच परिणाम म्हणजे सुदीपला देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्था DRDO मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
सुदीपची आई म्हणाली की, त्यांच्या मुलाचे बालपणापासूनचे स्वप्न होते की, देशाची सेवा करावी. तो आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत आज याठिकाणी पोहोचला आहे. पश्चिम बंगाल राज्यातील पूर्व मेदिनीपुर जिल्ह्यातील पंसकुरा येथील सुदीप मैती याच्या या यशानंतर आज कुटुंबीसांसह संपूर्ण गाव आनंदित आहे.
सुदीप बालपणापासून खूप हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी आहे. त्याच्या गावातील दुर्गा प्राथमिक शाळेत त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. पॉलिटेक्निकनंतर सुदीपने बी. टेकचे शिक्षण घेतले. सध्या तो आयआयटी गुवाहाटीमध्ये एमटेकचे शिक्षण घेत आहे.
त्याचे वडील हे दिव्यांग आहेत. तसेच ते मिस्तरीचे काम करायचे. त्याचे घरही झोपडी स्वरुपातील आहे. मात्र, त्याने आपल्या अभ्यासाच्या बळावर आपल्या मेहनतीने सर्वांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण सादर केले आहे.
