नीट ही देशातली सर्वांत मोठी मेडिकल प्रवेश परीक्षा आहे. यंदाच्या परीक्षेतल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आयएमए ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्कने केलीय. तसंच सर्व विद्यार्थ्यांसाठी निष्पक्ष आणि पारदर्शक मूल्यमापन प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी फेरपरीक्षा घेण्याची विनंती संघटनेनं केली असून तसं पत्र एनटीएला पाठवलं आहे.
पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
एनटीएला पाठवलेल्या पत्रात आयएमए ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्क संघटनेनं त्यांची भूमिका मांडली आहे. या पत्रामध्ये म्हटलं आहे, की 'नीट परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या ओएमआरच्या तुलनेत स्कोअरकार्डवर वेगवेगळे गुण मिळाले आहेत. शिवाय एकूण 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. ते अत्यंत संशयास्पद आहे. आतापर्यंत असं कधीच झालं नाही. साधारणत: तीन ते चार विद्यार्थ्यांनाच एवढे गुण आतापर्यंत मिळत आले आहेत. नीट 2024मधल्या या गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी व्हावी. तसंच सर्व विद्यार्थ्यांचं निष्पक्ष आणि पारदर्शक मूल्यमापन होण्यासाठी फेरपरीक्षा घेण्यात यावी. अशा महत्त्वाच्या परीक्षांच्या सचोटीवर आणि निष्पक्षतेवर भारताच्या शिक्षणव्यवस्थेचं भवितव्य अवलंबून आहे. तुम्ही आमच्या मागणीचा गांभीर्यानं विचार कराल, अशी खात्री आहे.'
advertisement
ग्रेस मार्क्स कसे दिले?
नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्क्सवरदेखील संघटनेनं आक्षेप घेतला आहे. याबाबत पत्रात म्हटलं आहे, की ' नीट परीक्षेत काही विद्यार्थ्यांना 718 आणि 719 गुण मिळाले असून, हे सांख्यिकीयदृष्ट्या संशयास्पद आहे. या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्क्सचं कोणतंही निश्चित कारण नाही. तसंच नीट 2024 चा पेपर अनेक ठिकाणी फुटला असला, तरी अद्याप कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही डॉक्टरांच्या संघटनेनं उपस्थित केलाय.
दरम्यान, नीट 2024 ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी जोर धरू लागल्याने, ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत, ते विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. कारण या परीक्षेत मिळणाऱ्या मार्क्सवरच मेडिकल अभ्यासक्रमाचे प्रवेश होत असतात.
