दोन वर्षांपूर्वी पाटण्याला आली मधू
मधू दोन वर्षांपूर्वी पाटण्याला आली होती. काहीतरी करायचं असं ठरवलं होतं, पण काय करायचं ते ठरलं नव्हतं. ती पाटण्यात काही कोचिंग क्लासेसमध्ये गेली तेव्हा त्यांनी शिकवायला नकार दिला. तृतीयपंथीय क्लासमध्ये आल्यास इतर मुलांवर वाईट परिणाम होतील असं म्हटलं गेलं. याचदरम्यान तिची भेट अदम्य अदिती गुरूकुल चालवणाऱ्या गुरू रहमान यांच्याशी झाली व तिने सर्व प्रकार सांगितला.
advertisement
रोज पाच ते सहा तास करायची कोचिंग
'सगळं ऐकल्यावर त्यांनी मला कोचिंगमध्ये अभ्यास करण्यास सांगितलं व माझ्या कपाळाला टिळा लावला. त्या दिवसापासून मी रोज पाच ते सहा तास कोचिंग करायचे. काही शंका असल्या की त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचे. आज त्याचे परिणाम संपूर्ण जगासमोर आहेत,' असे ती म्हणाली. समाजाचा आणि कुटुंबाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? असं विचारल्यावर मधू म्हणाली, 'मी समाजाबद्दल काही खास सांगू शकत नाही, पण कुटुंबाचा दृष्टिकोन माझ्याबद्दल चांगला होता.'
समाजाला दिला संदेश
मधू म्हणाली, 'माझं यश पाहायला माझे वडिल नरेंद्र प्रताप सिंह जगात नाहीत. माझी आई माला देवी खूप खूश आहे'. पाच भावंडांपैकी चौथी असलेल्या मधूला कुटुंबाने साथ दिली. सुरुवातीला ते विरोधात होते पण नंतर ते बदलले. गुरू रहमान यांच्याकडे कोचिंग घेताना अनेक विद्यार्थी सेल्फी घ्यायचे, आताही घेतात. आपल्या समाजातील लोकांनी काहीतरी वेगळं करण्याचा विचार करावा कारण त्यातूनच यश मिळतं. जे यश मी आता अनुभवतेय तेच बदल आपल्याला समाजात पाहायचे आहेत, असं तिने सांगितलं.
देशातील पहिली ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनली मधू
एका लहान गावात राहणारी मधू आता ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनली आहे. पहिल्यांदाच तीन ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बिहार पोलिसात सेवा बजावतील. या तिघांपैकी दोन ट्रान्समेन आणि एक ट्रान्सवुमन आहे. या बातमीने मधू आनंदी आहे. 'मी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि गुरु रहमान सरांचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचण्यात मदत केली,' असं ती म्हणाली.
