इंडिया टुडेच्या वृत्तात असं म्हटलं आहे, की भरतीच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन योग्यरीत्या झालं नाही, असं एव्हिएशन इंडस्ट्री एम्प्लॉयीज गिल्डचे सरचिटणीस जॉर्ज अब्राहम यांनी सांगितलं. भरतीसाठी प्रचंड गर्दी उसळल्याने प्रशासनाने अखेर जाहीर केलं, की उमेदवारांनी त्यांचे सीव्ही जमा करावेत आणि आपापल्या घरी जावं, जेणेकरून गर्दी ओसरू शकेल. जमा केलेले सर्व सीव्ही पडताळून पाहिले जातील आणि पात्र उमेदवारांशी पुढच्या प्रक्रियेसाठी संपर्क साधला जाईल, असं आश्वासन कंपनीने आव्हानात्मक परिस्थितीतही दिल्याचं समजतं.
advertisement
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसने 2216 रिक्त पदांवर भरतीसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यूची जाहिरात दिली होती. ही पदं हँडीमॅनची असून, या पदावरच्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या दुरुस्त्या, व्यवस्थापन करावं लागतं. तसंच, युटिलिटी एजंट्सची भरतीही करण्यात येणार होती. 28 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत असं म्हटलं होतं, की एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड रिक्त पदांवर भरती करणार असून, भविष्यात रिक्त होणार असलेल्या जागांसाठी वेटिंग लिस्टही तयार केली जाणार आहे. त्यासाठी दिलेल्या पात्रता निकषांत बसणाऱ्या भारतीय महिला किंवा पुरुष अर्ज करू शकतात. निवड झालेल्यांना तीन वर्षांच्या मुदतीसाठी मुंबईत काम करावं लागेल. उमेदवाराच्या कामगिरीनुसार तीन वर्षांनी काँट्रॅक्टचं नूतनीकरण केलं जाईल, असं त्या अधिसूचनेत म्हटलं होतं. तसंच, रिक्त पदांची दर्शविलेली संख्या केवळ अंदाजासाठी दिली असून, प्रत्यक्ष गरजेनुसार ती बदलू शकते, असंही त्यात स्पष्ट करण्यात आलं होतं.
राष्ट्रपतींच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरक्षणही लागू असेल आणि प्रत्यक्ष अपॉइंटमेंटच्या वेळच्या परिस्थितीनुसार ते लागू होईल, असंही त्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं होतं.
काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्येही असाच एक प्रसंग घडला होता. भरूचमध्ये थरमॅक्स कंपनीने अवघ्या 10 पदांसाठी भरती जाहीर केली होती. त्याकरिता इंटरव्ह्यूसाठी शेकडो उमेदवारांनी गर्दी केली होती. इंटरव्ह्यू सेंटरमध्ये प्रवेश करण्यासाठी झटापट करत असलेल्या गर्दीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
