पुण्यात नुकतीच एक घटना घडली. ईवाय नावाच्या कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या 26 वर्षीय ॲना सेबॅस्टियन पेराईल हिचा अतिकामाच्या ताणामुळे मृत्यू झाला. तिच्या आईने कंपनीला एक पत्र लिहून कामाच्या दबावामुळे मुलीचा मृत्यू झाला, असं सांगितलं. या घटनेनंतर देशभरात नोकरी करणारे लोक कामाच्या तासांबद्दल चर्चा करत आहेत. या दरम्यान आयएलओ (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन) म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये इतर अनेक देशांच्या कामाचे तास किती आहे त्याची माहिती आहे.
advertisement
कामाचे तास निश्चित असणे गरजेचे
प्रत्येक ऑफिसमध्ये कामाचे ठराविक तास असतात. म्हणजेच कर्मचारी ठराविक वेळेत ऑफिसमध्ये पंच इन करतो आणि 8-10 तास काम केल्यानंतर पंच आउट करतो. पण या कामाच्या तासादरम्यान तो किती वेळा त्याच्या जागेवरून उठतोय, त्याच्यावर कामाचा ताण किती आहे, घरी गेल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशीही त्याला काम करावे लागते का? या गोष्टींचे मॉनिटरिंग केले जात नाही. काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने उर्वरित लोकांवर काम जास्त करण्याचा दबाव असतो.
भारतातील लोक करतात सर्वात जास्त काम
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या ताज्या रिपोर्टनुसार, जगातील 10 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा विचार करता भारतीय सर्वाधिक काम करतात. भारतीयांच्या कामाच्या तासांनी अमेरिका, जपान, चीन, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, ब्राझील या सर्व देशांना मागे टाकले आहे. कोणत्या देशात लोक दर आठवड्यात ऑफिसमध्ये किती तास काम करतात ते जाणून घेऊयात.
भारतातील लोक एका आठवड्यात 46.7 तास काम करतात. चीनमधील लोक एका आठवड्यात 46.1 तास काम करतात, ब्राझीलचे लोक 39 तास, अमेरिकेतील लोक 38 तास, जापानमधील लोक 36.6 तास, इटलीतील लोक एका आठवड्यात 36.3 तास, यूकेमधील लोक 35.9 तास, फ्रान्समधील लोक 35.9 तास, जर्मनीमधील लोक 34.2 तास आणि कॅनडामधील लोक एका आठवड्यात 32.1 तास काम करतात,असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
