मुंबई : घरात गेम खेळताना दिसलो की आई जाम रागावते, याने काय पैसे मिळणार आहे का? तुझं करिअर होणार आहे का? असं ऐकायला मिळतं. यावर तुम्ही आईला हमखास सांगू शकता की हो, याने करिअर सेट होऊ शकतं. आता हे ठामपणे म्हणण्याचं कारण काय? आणि मुळात अचानक गेमबद्दल बोलण्याचं कारण काय? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील टॉप 7 गेमर्सची घेतलेली भेट. गेमींग क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि एकूण गेमिंगबाबत जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी ही भेट घेतली. तेव्हा भारत सरकार या क्षेत्राबद्दल किती आग्रही आहे, हे दिसून येतंय. म्हणून जाणून घेऊया, की भारतातील गेमिंग इंडस्ट्री कशी आहे? गेमिंगमध्ये कोणकोणते करिअर ऑप्शन आहेत?
advertisement
गेमिंगचं नाव निघालं की अनेकांच्या डोळ्यांसमोर चायनिज ड्रामा येतो. कारण यात गेमिंगबद्दल खुप दाखवलं जातं. चीनमध्ये असंही गेमिंग कल्चर खुप मोठं आहे आणि तिथे प्रोफेशनली लोक या क्षेत्राकडे पाहतात. मोबाईल गेम्स, कम्प्यूटर गेम्स जे आपण खेळतो ते मोस्टली चीन, अमेरिकासारख्या देशांतील आहेत. पण याचा अर्थ असा नाही की भारतात करियरसाठी हे क्षेत्र नाही.
भारतीय गेमिंग इंडस्ट्री दरवर्षी 27 टक्क्यांनी वाढतेय. आपल्या देशात 50 कोटींपेक्षा जास्त लोक कुठलातरी गेम खेळत असल्याचा रिपोर्ट आहे. आणि त्यामुळे करियर म्हणून याकडे बघितलं जातंय. सोपं उदाहरण सांगायचं तर लुडो किंग. लुडो किंग हा गेम विकास जैस्वाल या भारतीयाने बनवला आहे. कोव्हिड काळात या गेमने पिक घेतला. 2020 मध्ये कोव्हिड दरम्यान या गेमने एकावर्षात 20 मिलियन डॉलर छापले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत या गेमची क्रेझ कायम आहे. रोज अंदाजे 5 करोडपेक्षा जास्त लोक हा गेम खेळतात अशी माहिती आहे.
इंडस्ट्री ट्रेंडच्या आधारे सांगायचं तर या बिजनेसमध्ये ज्यांना दोन-तीन वर्षांचा अनुभव आहे आणि स्किल आहे, असे लोक वर्षाला 5 ते 7 लाख रुपये कमवू शकतात. फ्रीलांसरसाठीही भरपूर संधी आहेत. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रकल्पांच्या आधारे फ्रीलांसर दरवर्षी 10-15 लाख रुपये कमवू शकतात.
शिवाय भारत सरकार देखील या क्षेत्राबद्दल आग्रही झाल्याने बरीच मदत होऊ शकते. 2023 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘AVGC’ या नवीन टास्क फोर्सच्या स्थापनेची घोषणा सरकारने केली होती. AVGC म्हणजे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक या चार क्षेत्रातील जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी या नवीन टास्क फोर्स स्थापना करण्यात आली. यामुळे भारतीय गेमर्सना गेमिंग इंडस्ट्रीतील किमान 5% उद्योग शोधता येतील आणि दरवर्षी नवीन नोकऱ्या निर्माण करता येतील, असं सांगण्यात आलंय. शिवाय आता तर स्वत: पंतप्रधानांनी गेमर्सशी भेट घेतल्याने अपेक्षा वाढल्या आहेत.
1. पहिलं करियर ऑप्शन आहे प्रोस्युमर म्हणजेच प्रोफेशनल कन्ज्युमर.
भारतात असे अनेक गेमर्स आहेत जे टूर्नामेंट खेळून, स्ट्रीमिंग करून, गेम रिव्यू देऊन पैसे कमावतात. तुम्ही देखील असं करू शकतात. पण यासाठी तुम्हाला खूप कौशल्याची, प्रॅक्टिसची आणि संयमाची गरज असते. एका गेमला समजून घेण्यासाठी 60 ते 70 तास गेमर्स देतात, त्यातील लहानातल्या लहान ट्रिक्स समजून घेतात. याद्वारे ते टूर्नामेंट्समध्ये जातात, प्राईज जिंकतात, शिवाय स्ट्रिमिंग करून तरूणांना गेमबद्दल माहिती देतात. यामुळे अलीकडे भारतात तरूणांचा गेमिंगकडे कल वाढल्याचं दिसतंय.
2. गेमिंग डिझायनर
तुम्हाला जर स्टोरीटेलिंग आवडत असेल आणि त्याला व्हिज्यूअली तुम्ही मांडू शकत असाल तर तुम्ही गेम डिझायनिंग करू शकता. व्हिडीओ एडिटर किंवा ऍनिमेटर असाल तर तुम्हाला जास्त स्कोप आहे. कॉम्प्युटर सायन्स किंवा गेम डिझायनिंगमध्ये बॅचलर डिग्री घेऊन तुम्ही प्रोफेशनली यात उतरू शकतात.
3. गेम डेव्हलपर
गेम डिझायनर गेमची आराखडा मांडू शकतो, कॅरेक्टर्स उभे करू शकतो पण त्याला फक्शनल करण्यासाठी गेम डेव्हलपर किंवा प्रोग्रामरची गरज असते. डेव्हलपर गेमला खेळण्यायोग्य फॉरमॅटमध्ये रूपांतरित करतो. तो गेम आणि डिझाइन सॉफ्टवेअरच्या वैशिष्ट्यांनुसार आणि कार्यक्षमतेनुसार कोड लिहीतो. तेव्हा कोडिंग शिकु शकता. गेम प्रोग्रामिंग किंवा डेव्हलपमेंटमध्ये बॅचलर पदवी घेऊ शकता.
4. गेम टेस्टर
गेम टेस्टर हे गेम खेळून त्याच्या गुणवत्तेची खात्री करतात. बग ओळखणं आणि प्रोग्रामरना सुधारणा सुचवणं हे त्यांचं काम. यासाठी कम्प्यूटक सायन्समध्ये B.tech/BE ची पदवी घेऊन भारतीय टेस्टींग बोर्ड किंवा त्याच्या लेव्हलला असलेल्या एखाद्या संस्थेतून तुम्ही व्यावसायिक प्रमाणपत्र घेऊ शकता.
5. डेटा अनालायझर
डेटा अनालायझर हे गेमिंगमधील बारकावे शोधतात, जसं की एखाद्या गेममध्ये कोणत्या लेव्हलपर्यंत साधारणत: लोक पोहोचतात. कुठे अडकतात. अशा गोष्टींच्या डेट्याच्या आधारे गेम अजून चांगला डेव्हलप करता येतो. त्यात नवीन लेव्हल अड करता येतात किंवा एखादी लेव्हल सोपी करणं, अवघड करणं गरजेचं आहे, हे समजतं. कुठल्याही गेमच्या यशासाठी ऑडियन्सचं अनलाईजिंग करणं गरजेचं असतं. तेव्हा डेटा सायन्सची प्रॉपर शिक्षण तुम्ही घेऊ शकता आणि गेमिंगमध्ये उतरू शकतात.
याशिवाय ऑडिओ इंजिनियर, ट्रान्सलेटर, मार्केटिंग प्रोफेशनल अशांनाही गेमिंगमध्ये स्कोप आहे. सरकार या क्षेत्राला भारतात वाढवण्यासाठी प्रयत्न करतंय. सोबतंच आंतरराष्ट्रीय कंपन्या देखील भारतात इन्वेस्ट करायला तयार आहेत. तेव्हा करियर ऑप्शन आहे, गरज आहे ती फक्त कौशल्याची आणि ते दाखवता येण्याची.
