100 जणांना तुम्ही एका कुरिअर कंपनीचं नाव विचारलं तर 90 जण तुम्हाला ‘डीटीडीसी’ हेच नाव सांगतील. सुभाशीष चक्रवर्ती हे याच डीटीडीसी कुरिअरचे संस्थापक आहेत. सध्या ते या कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तुम्हीही अनेकदा डीटीडीसीकडून कुरिअर केलं असेल किंवा तुम्हाला या कंपनीमार्फत कुणी ना कुणी कुरिअर पाठवलं असेल.
केमिस्ट्रीमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा विद्यार्थी कुरिअरच्या व्यवसायात कसा गेला, दोन हजार कोटी रुपयांची कंपनी कशी उभी राहिली हे प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. खरं तर या प्रश्नाचं उत्तर स्वतः सुभाशीष चक्रवर्तींकडेही नाही. कदाचित त्यांनी असा विचारही केला नव्हता. ते म्हणतात, ‘त्या वेळी चांगले मार्क मिळवून ग्रॅज्युएट व्हायचं आणि नोकरी करायची एवढंच कळत होतं.’ मग कुरिअर कंपनी कशी सुरू झाली, ते जाणून घेऊ या.
advertisement
कोलकात्यातल्या एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या सुभाशीष चक्रवर्ती यांनी रामकृष्ण मिशन रेसिडेन्शियल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. शिक्षण सुरू असतानाच ते पीअरलेस या मोठ्या इन्शुरन्स कंपनीत काम करत होते. पूर्व भारतात या कंपनीचं काम चांगलं होतं; पण दक्षिणेत ही कंपनी फारशी कुणाला माहिती नव्हती. कंपनीने 1981 मध्ये सुभाशीष यांना दक्षिण भारतात व्यवसाय विस्तार करण्यासाठी बेंगळुरूमध्ये पाठवलं. त्यांनी काही वर्षं ते केलंही; मात्र आपल्याला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे हे मनात नक्की होतं. अनेक वर्षं नोकरी केल्यामुळे इन्शुरन्समधली माहिती होती; पण त्यात रस नव्हता. केमिकल्सचं ज्ञान होतं आणि रसही होता. त्यामुळे 1987मध्ये नोकरी सोडून सुभाशीष यांनी केमिकल डिस्ट्रिब्युशन कंपनी सुरू केली. हा व्यवसाय फारसा चालला नाही. त्याला कारण ठरली पोस्टल सर्व्हिस. कुरिअर कंपनीबरोबर काम करताना अनेक अडचणी आल्या. पोस्ट आणि ग्राहक यांच्यात दरी असल्याचं सुभाशीष यांनी जाणलं. त्यामुळेच 26 जुलै 1990 ला त्यांनी डीटीडीसी कुरिअर या कंपनीची सुरुवात केली. डीटीडीसीचं पूर्ण नाव ‘डेस्क टू डेस्क कुरिअर ॲंड कार्गो’ असं आहे.
सुरुवातीच्या दिवसांत फक्त मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रित केल्यानंतर कुरिअरची खरी गरज ही लहान गावं आणि छोट्या शहरांमध्ये असल्याचं सुभाशीष यांच्या लक्षात आलं. म्हैसूर, मेंगलोर, हुबळीसह केरळ, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या छोट्या शहरांमध्ये कुरिअरची गरज अधिक असल्याचं त्यांनी ओळखलं. 1990मध्ये 20,000 रुपयांच्या भांडवलावर त्यांनी हा उद्योग सुरू केला होता. त्यात अनेक अडचणी आल्या. व्हेंचर कॅपिटल नसल्यामुळे बॅंकेने कर्ज द्यायला नकार दिला. त्या वेळी नाईलाजाने आईचे दागिने विकून पैसे उभे करावे लागल्याचं सुभाशीष सांगतात. काही दिवसांनी पुन्हा पैसे कमी पडले तेव्हा फ्रॅंचायजी मॉडेलचा मार्ग त्यांनी निवडला आणि सगळी गणितं बदलली. त्यांनी झोन्समध्ये कामाची विभागणी केली. एक रीजनल ब्रॅंच 30 फ्रॅंचायझी सांभाळू लागली. नंतर डीटीडीसीने आपलं सॉफ्टवेअरही फ्रॅंचायझींना दिलं. त्यामुळे कुरिअरचं रिअल टाइम ट्रॅकिंग करणं शक्य झालं. कुरिअर पाठवणाऱ्याला ते कुठे पोहोचलं, ते कधी पोहोचणार आहे हे कळणं ही एक क्रांती होती. त्यामुळे डीटीडीसी कुरिअर कंपनीची भरभराट झाली. सध्या ही कंपनी सुमारे 14,000 पिन कोड्सवर सेवा पुरवते. रिटेल ग्राहक आणि बिझनेस कंपन्यांना सेवा देते. कुरिअर तुमच्या घरातून पिकअप करून हवं तिथे डिलिव्हरी देते. कंपनीचे 14,000 कस्टमर ॲक्सेस पॉइंट्स असून त्यापैकी 96 टक्के ॲक्सेस पॉइंट्स भारतातले आहेत. जगातल्या 220 ठिकाणी डीटीडीसीची सेवा पोहोचते.
आज डीटीडीसीचे मोठमोठे क्लायंट्स आहेत. विप्रो, इन्फोसिस, टाटा अशा अनेक कंपन्या त्यात आहेत. 2006 पर्यंत कंपनीच्या 3700 फ्रॅंचायझी होत्या आणि रेव्हेन्यू 125 कोटी रुपये होता. त्याच वेळी रिलायन्स कॅपिटलकडून 70 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आणि डीटीडीसी ही 180 कोटी रुपयांची कंपनी झाली. 2010पर्यंत फ्रॅंचायझींची संख्या 5000 झाली. विक्री 450 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. 2013मध्ये डीटीडीसीने निक्कोस लॉजिस्टिक्समध्ये 70 टक्के भागीदारी केली आणि डॉटजोट ही सेवा सुरू केली. ई-कॉमर्स कंपन्यांसाठी भारतातलं ते पहिलं डिलिव्हरी नेटवर्क ठरलं. 2015मध्ये हैदराबादमध्ये ऑटोमेटिक लॉजिस्टिक हब उभं करण्यात आलं. 2018च्या माहितीनुसार कंपनी दर वर्षी 150 मिलियन पॅकेट्स पोहोचवत असे, तर फ्रॅंचायझींची संख्या 10,700 पर्यंत पोहोचली होती. कुरिअर क्षेत्रात डीटीडीसीचा मार्केट शेअर 15 टक्के आहे. सध्या कंपनीचा रेव्हेन्यू 2000 कोटी रुपये असेल असा अंदाज आहे. काही वर्षांपूर्वी एका मोठ्या मीडिया हाउसने कंपनीच्या आयपीओबद्दलचं वृत्त दिलं होतं; मात्र अधिकृत माहिती उपलब्ध नाही. डीटीडीसी 3000 कोटी रुपयांचा आयपीओ आणणार असल्याचं त्यात म्हटलं होतं; मात्र कंपनीने अद्याप आयपीओ आणलेला नाही.
