नर्मदापुरम : सध्या सर्वत्र परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे यंत्रणाही परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी कार्यरत आहेत. मात्र, यातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ठिकाणी ग्रीन बोर्डवर खुलेआम लिहून सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण घटना -
ही घटना मध्यप्रदेशातील नर्मदापूरम जिल्ह्यातील केसला तालुक्याच्या बिछुआ गावातील माध्यमिक शाळेत घडला. पाहणीसाठी आलेल्या बीआरसी केके शर्मा यांनी एका तरुणाला ग्रीन बोर्डवर लिहिलेल्या उत्तरांना पुसताना पाहिले. या तरुणाने पथकाला पाहताच फलकावर लिहिलेली उत्तरे पुसून वर्गातून पळ काढला.
advertisement
केसलामध्ये प्राथमिक आणि माध्यमिकच्या पाचवी आणि आठवीच्या परीक्षा 22 केंद्रांवर झाली. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील शिक्षिकाही ड्युटीवर नसलेल्या वर्गात आढळून आली. ही घटना 12 मार्च रोजी घडली. मात्र, शाळा व्यवस्थापन आणि केंद्रप्रमुख अद्यापही संशयित तरुणाचा शोध घेऊ शकलेले नाहीत. तो तरुण शाळेत बोर्डावर खुलेआम कॉपी करत होता.
बीआरसी शर्मा यांनी सांगितले की, 12 मार्चला आठवीचा विज्ञानाचा पेपर होता. सकाळी 09:40 वाजता जिल्ह्यातील केसला तालुक्यातील बिछुआ परीक्षा केंद्रात पथक निरीक्षण करण्यासाठी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर शाळेतील 4 नंबरच्या खोलीत एक संशयित तरुण टॉवेलने ग्रीन बोर्डवरील उत्तरे खोडताना दिसला. त्याच्याशी संवाद साधायला गेलो असता त्याने तिथून पळ काढला. याचवेळी त्याठिकाणी शिक्षिका ज्योती पटेलही उपस्थित होत्या. मात्र, त्यांची ड्युटी ही 8 नंबरच्या खोलीत होती. या सर्व प्रकारानंतर केंद्रप्रमुख अनिल दुबे आणि शिक्षिका ज्योति पटेल यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.
सर्व उत्तरपत्रिकेत एकसारखी उत्तरे -
बीआरसी शर्मा यांनी सांगितले की, इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे पाहिल्यावर त्यांना ती एक एक करून सोडवलेली दिसली. सर्वांची उत्तरे ही एकसारखी आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारानंतर केंद्रप्रमुख अनिल दुबे आणि शिक्षिका ज्योती पटेल यांच्याकडून उत्तर मागवण्यात आले आहे.
