योगेश रोहिला असं अटक केलेल्या हल्लेखोर भाजप नेत्याचं नाव आहे. तो भाजप युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. शनिवारी दुपारी त्याने आपल्या कुटुंबावर बेछूट गोळीबार केला. ज्यात ११ वर्षीय मुलगी श्रद्धा, मुलगा शिवांश (४) आणि देवांश (६) अशा तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर ३१ वर्षीय पत्नी नेहा गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या सहारनपूर इथं घडली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश रोहिला यांनी शनिवारी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान त्यांच्या परवानाधारक बंदुकीतून हा गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी त्याच्या घरी धावले. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, त्याची पत्नी आणि तीन मुले रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं. यावेळी भाजप नेता जवळच उभा होता. जेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जमाव त्याच्या मागे धावला, त्याला पकडले आणि मारहाण केली. आतापर्यंतच्या पोलिस तपासात असे दिसून आले आहे की भाजप नेत्याने आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हा गोळीबार केला आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून योगेशचं मानसिक स्वास्थ ठीक नव्हतं. मानसिक तणावातून त्याने आपल्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला सध्या अटक केली आहे. पोलीस हत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.