छत्रपती संभाजीनगर शहरातील एस बी कॉलेज जवळ प्रेमचंद जैन नावाचे एक अंकल आहेत, जे या ठिकाणी दाबेलीची विक्री करतात. दाबेलीचा व्यवसाय सुरू करण्याअगोदर ते मुंबई या ठिकाणी खाजगी नोकरी करत होते. पण काही कारणास्तव त्यांना परत छत्रपती संभाजीनगर शहरात यावे लागले. शहरामध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक असे व्यवसाय केले.
advertisement
तेलाचा व्यवसाय केला, किराणा दुकानही केले, पण त्यामध्ये त्यांना काही यश आले नाही. एक दिवस एक कार्यक्रम होता, त्या ठिकाणी खाण्याचे स्टॉल लागले होते. त्या ठिकाणी त्यांनी त्यांची दाबेली ठेवली आणि तीन तासांमध्ये 400 च्या वर दाबेलीची विक्री केली आणि तेव्हापासून त्यांनी ठरवले की आपण दाबेलीचा व्यवसाय सुरू करूया.
मग शहरातील औरंगपुरा भागामध्ये एका दुकानासमोर एक टेबल टाकून त्यांनी त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस व्यवसायामध्ये अडचणी आल्या, पण तरी देखील त्यांनी व्यवसाय सुरू ठेवला आणि आज त्यांचा व्यवसाय एकदम व्यवस्थित चालू आहे. सुरुवातीला ते तीन रुपयांना दाबेलीची विक्री करायचे, मग त्यानंतर त्यांनी हळूहळू दर वाढवले आणि सध्या वीस रुपयांना त्यांच्याकडे दाबेली मिळते. दिवसाला 150 दाबेली आणि पफची विक्री होते. यामधून त्यांना दिवसाला 3000 हजार रुपये मिळतात.
सध्या शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयाजवळ त्यांचे दुकान आहे, अंकल्स दाबेली म्हणून. त्यांची मुलं नोकरी करतात, पण त्यांना आवड आहे म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरू ठेवलेला आहे. त्यांची पत्नी देखील त्यांना सर्व साहित्य बनवून द्यायला मदत करते आणि घरीच सर्व साहित्य हे नवरा-बायको तयार करतात आणि या ठिकाणी विक्री करतात. या ठिकाणी दाबेली आणि पफ हे दोन्ही मिळतात.
त्यांनी त्यांच्या दुकानाचं नाव अंकल्स दाबेली यामुळे ठेवलं की, त्यांना सर्वच विद्यार्थी किंवा इतरही जे लोक अंकल म्हणायचे, म्हणून त्यांनी दुकानाचे नाव अंकल्स दाबेली ठेवले आहे..





