एकीकडे दिवाळीची आतषबाजी सुरू असताना राजधानी दिल्ली गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. दिल्लीतील रोहिणी येथे पोलिसांनी मोठी चकमक केली. दिल्ली पोलिसांच्या कारवाईत बिहारच्या सिग्मा टोळीतील चार मोस्ट वॉन्टेड गुंड ठार झाले. मृतांमध्ये बिहारच्या सीतामढी येथील रहिवासी सिग्मा टोळीचा प्रमुख रंजन पाठक याचाही समावेश होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या पथकाला हे सर्व गुंड रोहिणी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
advertisement
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ आणि २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे २:२० वाजता दिल्लीच्या रोहिणी परिसरातील डॉक्टर आंबेडकर चौक आणि पानसाळी चौक दरम्यान बहादूर शाह मार्गावर बिहार पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाची चार संशयित गुन्हेगारांसोबत चकमक झाली. चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. त्यानंतर, हे चारही गुंड दिल्ली पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडले.
चकमकीनंतर, सर्व आरोपींना दिल्लीच्या रोहिणी येथील डॉ. बीएसए रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी चारही गुंडांना मृत घोषित केले. रंजन पाठक (वय 25 वर्षे, सीतामढी जिल्हा, बिहार), बिमलेश महातो उर्फ बिमलेश साहनी (वय 25 वर्षे, रा. रतनपूर), मनीष पाठक (वय 33 वर्षे रा. मलाहाई) आणि अमन ठाकूर (वय 21 वर्षे, रा. शेरपूर, दिल्ली) असं चकमकीत मृत पावलेल्या गुंडांची नावं आहेत. हे सर्व आरोपी बिहारमधील अनेक गंभीर गुन्ह्यांमधील मोस्ट वॉण्टेड आरोपी आहेत.