भाजपचे विविध नेते आणि पदाधिकारी विविध अडचणीत सापडत असताना आता नागपुरात भाजपच्या माजी नेत्याचा एक कांड उघडकीस आला आहे. संबंधित पदाधिकारी विमानतळावर गेला असता, त्याच्या बॅगमध्ये पोलिसांना एक पिस्तूल आणि दोन काडतुसे आढळले आहेत. सुरुवातीला आरोपीनं आपल्या बॅगेत पिस्तूल कुणी ठेवलं माहीत नसल्याचा दावा केला. मात्र त्यानंतर त्याने संबंधित पिस्तूल आपलंच असल्याचं कबुल केलं आहे.
advertisement
हा प्रकार नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी संध्याकाळी उघडकीस आला. नागपूरहून दिल्लीला प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून एक देशी पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. अरुण श्रीकृष्ण पोराद (३८ वर्षे) असे आरोपी प्रवाशाचे नाव असून तो यवतमाळचा रहिवासी आहे. अरुण हा माजी भाजप पदाधिकारी असल्याचे सांगितले जाते. सीआयएसएफकडून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यानंतर त्याला सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
शुक्रवारी संध्याकाळी ६:४५ वाजता इंडिगो एअरलाइन्सच्या नागपूर-दिल्ली फ्लाइट क्रमांक ६ ई २२१३ वरून तो दिल्लीला जाण्याच्या तयारीत होता. त्याने बॅगेत एक देशी पिस्तूल आणि दोन काडतुसे ठेवली होती. सीआयएसएफने केलेल्या यांत्रिक तपासणीदरम्यान त्याच्या बॅगेत शस्त्रे असल्याचे दिसून आले. यानंतर, पथकाने बॅगची झडती घेतली तेव्हा त्यात एक पिस्तूल आणि काडतुसे आढळली. सीआयएसएफच्या जवानांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि आरोपीला आपल्या ताब्यात घेतले. देशी पिस्तूल आणि काडतुसे कुठून आली हे त्याला माहिती नाही, ते कुणी तरी बॅगेत ठेवले असा त्याने अगोदर दावा केला.
मात्र, कठोर चौकशी केल्यानंतर त्याने सांगितले की, त्याने हे पिस्तूल दोन महिन्यांपूर्वी खरेदी केले होते. त्याच्याकडे पिस्तुलाचा परवानाही नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण हा कृषी व्यापारी असून त्याची डाळमिल आहे. व्यवसायाच्या संदर्भात एका सरकारी संस्थेच्या दिल्ली कार्यालयात जात होता. रात्री उशिरापर्यंत सीआयएसएफकडून त्याची चौकशी करण्यात आली. आता सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात आहे.
