मिळालेल्या माहितीनुसार, शहनाज उर्फ सोनल असं पीडित महिलेचं नाव आहे. शहनाजने पाच वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे राहत असलेल्या सागर या मुलासोबत आंतरधर्मीय विवाह केला होता. हे लग्न शहनाजच्या कुटुंबीयांना मान्य नव्हतं. त्यांनी सुरुवातीपासून या लग्नाला विरोध केला. पण मुलीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन संबंधित मुलासोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली होती. या दाम्पत्याला एक मुलगाही झाला.
advertisement
दरम्यान, अलीकडेच पीडित महिला आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी माहेरी गेली होती. पण आंतरधर्मीय लग्न केल्याचा मनात राग धरून विवाहितेच्या आई वडिलांनी पोटच्या मुलीला आणि नातवंडाला 2 महिने डांबून ठेवलं. दोघांच्याही हाता-पायाला साखळीने बांधल्याची माहिती आहे. पत्नीसह मुलाला अशाप्रकारे सासुरवाडीच्या लोकांनी डांबून ठेवल्यानंतर पीडित विवाहितेच्या पतीने औरंगाबाद खंडपीठासमोर दाद मागितली. न्यायालयाने पीडित तरुणाची सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर भोकरदन पोलिसांना विवाहितेची सुटका करून तिला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहिता आणि तिच्या मुलाची सुटका केलीय. तसेच सर्व कार्यवाही पूर्ण केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिले आहे. शिवाय भविष्यात या जोडप्याला सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन देखील पोलिसांकडून देण्यात आलं आहे. या घटनेचा अधिक तपास भोकरदन पोलीस करत आहेत.