मिळालेल्या माहितीनुसार, माओवाद्यांशी कनेक्शन असल्याच्या कारणातून लकडगंज पोलिसांनी पत्रकाराला अटक केली आहे. तसेच त्याच्या मैत्रिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रेजाज एम. शीबा सिदीक (एडापल्ली, केरळ) असे अटक केलेल्या पत्रकाराचं नाव आहे. मैत्रीण ईशा असं ताब्यात घेतलेल्या तरुणीचं नाव आहे. सिदीक हा फ्रीलान्स पत्रकार म्हणून काम करीत होता.
सिदीक यांचे माओवादी कनेक्शन असून ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. तसेच भारतीय सैन्यावर देखील आक्षेपार्ह लेखन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी सिदीक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता.
advertisement
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सिदीक यांचा शोध सुरू केला. दरम्यान, ते दिल्ली येथे गेल्याचे कळाले. त्यानंतर ते दिल्लीहून नागपुरात आले. इथं मैत्रिणीला भेटण्यासाठी ते एका हॉटेलमध्ये थांबले असता पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी मैत्रिणीला ताब्यात घेतलं असून दोघांची कसून चौकशी केली जात आहे. दोघांकडून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याचं सांगत पोलीस विभागाकडून गुप्तता बाळगली आहे.
