या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पतीने पत्नी हरवल्याची पोलीस तक्रार दाखल केली आहे. पतीने या तक्रारीत नमूद केल्यानुसार, 2007मध्ये त्याचं लग्न झालं होतं. शास्त्रीनगर परिसरातल्या भट्टा बस्ती पॉवर हाउसजवळ तो आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. गेल्या तीन महिन्यांत अचानक पत्नीच्या वागण्यात बदल होऊ लागला. तिच्यावर कथितपणे काली देवीचा प्रभाव दिसू लागला होता. अनेकदा ती घरात जोरजोरात जयजयकार करत होती. पतीने तिला समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती त्याला मारहाण करत होती.
advertisement
18 डिसेंबर रोजी दोन्ही मुलं शाळेतून घरी परतल्यानंतर त्यांना आई घरी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांना याबाबत माहिती दिली. पती घरी आल्यानंतर त्याला एक पत्र सापडलं. "मी घर सोडत आहे, मला आता तुझ्याशी आणि या कुटुंबाशी काही देणंघेणं नाही. मी विधवेप्रमाणे जगेन. तू मला मारहाण करायचास आणि मी तुला शाप देते... कालिमाता तुझा नाश करील," असं त्या पत्रात लिहिलेलं होतं.
हे विचित्र पत्र पाहून पतीसह सर्वांनाच धक्का बसला. महिलेच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.
शास्त्रीनगरचे एसीपी राजेश कुमार जांगिड यांनी दिलेल्या माहितीनुसार, भट्टा बस्ती पोलीस स्टेशनमध्ये ही महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या बेपत्ता महिलेचा शोध सुरू आहे. बेपत्ता होण्यापूर्वी महिलेने घरी एक पत्र ठेवलं होतं. त्यात तिने पतीवर मारहाणीचा आरोप केला आहे. याचाही तपास सुरू आहे.
पतीने सांगितल्याप्रमाणे खरोखर या महिलेच्या अंगात कालिदेवी येत होती की तिने आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी देवीच्या नावाचा आधार घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तूर्तास ही बाब परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
