आयुष सुनील फाये असं आत्महत्या करणाऱ्या १७ वर्षीय मुलाचं नाव आहे. तो कामठी येथील केंद्रीय शाळेत इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचे लेखनिक आणि पोलीस हवालदार म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी सोमवारी २८ एप्रिलला आयुषचा अकरावीचा निकाल लागला होता. त्यामुळे आयुष शाळेत निकाल आणायला गेला होता. मात्र तो गणित विषयात नापास झाल्याने शिक्षकाने निकाल द्यायला नकार दिला.
advertisement
पालकांना घेऊन आल्यानंतर निकाल मिळेल, अशी तंबी शिक्षकाने दिली. नापास झाल्याबद्दल वडिलांना समजलं तर वडील मारतील, या भीतीने आयुष तणावात आला. यानंतर तो घरी आला आणि त्याने आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोमवारी घटनेच्या काही वेळ आधी सायंकाळी सातच्या आसपास आयुष आपल्या घरासमोर मित्रांसमवेत क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळून झाल्यानंतर त्याने मित्राला भेटायला जातोय, असं आईला सांगितलं. तो सायकल घेऊन घरातून निघून गेला.
यानंतर त्याने कन्हान नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या आत्महत्येमागं फक्त नापास होण्याचं कारण आहे की आणखी काही? याचा तपास पोलीस करत आहेत. पण केवळ नापास होण्याच्या कारणातून अकरावीत शिकणाऱ्या मुलानं अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
