दरम्यान, नागपुरात एका काश्मिरी विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली. संबंधित विद्यार्थी रस्त्याच्या कडेला उभा असताना जमावाने बेदम मारहाण केली आहे. जमावाने आधी संबंधित विद्यार्थ्याकडे विचारपूस केली. विद्यार्थ्याला समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. यातून संशय बळावल्याने जमावाने काश्मिरी विद्यार्थ्यावर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली. शेवटी पीडित तरुणाच्या हॉस्टेलमधील काही जणांनी मध्यस्थी केल्यानंतर विद्यार्थ्याला सोडण्यात आलं.
advertisement
या मारहाणीचा व्हिडीओ काश्मीरमधून ‘एक्स’ अकाऊंवर प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याने कसलीही पोलीस तक्रार दाखल केली नाही. मोहम्मद वसीम असं पीडित विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मूळचा काश्मीरचा रहिवासी असून नागपुरच्या कामठी येथील किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फॉर्मसी शिकत आहे. घटनेच्या दिवशी वसीम हा आपला मित्र पीयूष याच्यासोबत बाजारात गेला होता.
बाजारातून परत येताना पीयूष लघुशंकेला गेला. त्यावेळी वसीम एकटाच रस्त्यावर उभा होता. यावेळी तिथे आलेल्या काही युवकांनी संशय घेत वसीमकडे विचारपूस करायला सुरुवात केली. पण वसीमला टोळक्याने विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. संशय बळावल्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण केली.
मारहाणीचा आवाज ऐकून धावून आलेल्या पीयूषने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच तो कॉलेजचा विद्यार्थी असल्याचं सांगितलं. तसेच त्याची ओळख पटवण्यासाठी हॉस्टेलमधील इतर मित्रांना बोलावलं. त्यानंतरच जमावाने वसीमला सोडलं. या घटनेची चित्रफीत काश्मीरमधील विद्यार्थी संघटनेने ‘एक्स’वर टाकल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून चौकशी केली. पण, पीडित विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली नाही.
