काय झालं नेमकं?
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी, अर्शद टोपी आणि टोळीच्या प्रमुखाची पत्नी बाईकवरून फिरायला बाहेर गेले होते. त्यानंतर कोराडी परिसरात त्यांच्या बाईकला जेसीबी मशीनने धडक दिली. या अपघातात टोपीला किरकोळ दुखापत झाली, परंतु महिला गंभीर जखमी झाली. कोराडी थर्मल प्लांटच्या पेट्रोलिंग वाहनाने तिला ताबडतोब जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले, परंतु तिथे तिला उपचार नाकारण्यात आले. यानंतर, कामठीतील दुसऱ्या रुग्णालयानेही तिला दाखल करण्यास नकार दिला.
advertisement
अखेर, टोपीने महिलेला नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (GMCH) दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका चालकाला पैसे दिले. परंतु शुक्रवारी सकाळी महिलेचा मृत्यू झाला. टोपी रुग्णालयात जखमी महिलेसोबत GMCH च्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला.
अपघात की घातपात?
बॉसच्या पत्नीच्या मृत्यूची बातमी पसरताच, इप्पा टोळीत एकच खळबळ उडाली. टोपीला 'देशद्रोही' घोषित केले आणि त्याला ठार मारण्याची शपथ घेतली. हा अपघात नसून टोपीने तिला ठार केलं असल्याचा संशय गँगमधील इतर गुंडांना आहे. आता, गँगमधील 40 गुंडांनी नागपूर आणि कामठीमध्ये त्याचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
टोपीने घेतली पोलिसांची मदत...
जीवाचं बरं-वाईट होईल या भीतीने टोपीने शुक्रवारी पार्डी येथील पोलिस उपायुक्त (DCP) कार्यालयात आश्रय घेतला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून, DCP ने त्याला कोराडी पोलिस ठाण्यात पाठवले, जिथे त्याचा जबाब नोंदवण्यात आले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'आतापर्यंतच्या आमच्या तपासात असे दिसून आले आहे की महिलेचा अपघातात मृत्यू झाला. हत्येचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत.'
इप्पा टोळी बदला घेण्याच्या तयारीत...
मोमिनपुरा आणि डोबी भागात गुन्हेगारी कारवायांसाठी आधीच कुप्रसिद्ध असलेल्या इप्पा टोळीने आता टोपीला संपवण्यासाठी शपथ घेतली आहे. टोपीने फक्त बॉसचा विश्वासघात केला नाही तर त्याच्या पत्नीचीदेखील हत्या केली असल्याचे गँगमधील इतर सदस्यांचे म्हणणे आहे.
कोण आहे इप्पा गँग?
टोळीचा प्रमुख इरफान खान आहे, ज्याला इप्पा म्हणून ओळखले जाते. ही टोळी बऱ्याच काळापासून नागपूरच्या मोमिनपुरा आणि डोबी भागात सक्रिय आहे. ही टोळी ड्रग्ज तस्करी, बेकायदेशीर शस्त्रांचा व्यापार आणि खंडणी यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे. 2015 मध्ये इप्पाच्या अटकेच्या बातम्या समोर आलेल्या. अटकेनंतरही गँगच्या कारवाया कमी झाल्या नव्हत्या.
