आसीफ बबलू खान (वय २३, रा.प्रवेशनगर) आणि रोहित (वय २२, रा. यशोधरानगर चौक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मोहम्मद नईम मोहम्मद वकील अन्सारी (वय २८, रा. प्रवेशनगर) असं मयताचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसीफ आणि मोहम्मद नईम हे दोघेही कुख्यात गुंड आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यात वैर आहे. या वैरातून त्यांच्यात अनेकदा भांडण आणि हाणामारी देखील झाली आहे.
advertisement
आरोपी आसीफ हा मोटार मेकॅनिक म्हणूनही काम करतो. त्याच्यावर यशोधरानगर आणि इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गँगवॉरच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी नईम आणि आसिफ यांच्यात हाणामारी झाली होती. शुक्रवारी सकाळी एका किराणा दुकानाजवळ ही घटना घडली. यावेळी मयत नईम आणि त्याच्या काही साथीदारांनी आसीफला शिवीगाळ केली.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या आसीफने नईमला संपवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सायंकाळी तो भेटल्यावर आसीफने धारदार चाकूने नईमच्या पोटावर वार केला. हा हल्ला इतका भयंकर होता की यात मोहम्मद नईम रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला.हा हल्ला केल्यानंतर आसीफ आणि त्याचा मित्र रोहित घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
