नागपूरातील धरमपेठ परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा काही युवकांनी भररस्त्यावर धिंगाना घातला. तरुणांनी अंगातील शर्ट काढून रस्त्यावर आरडाओरड आणि गोंधळ घातला. परिसरातील रहिवासांनी तरुणांचा हा सगळा प्रताप आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. याबाबतचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी धुडगूस घालणाऱ्या तरुणांवर तत्काळ कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास काही युवकांनी चारचाकी गाडीतून येत, जोरजोरात हॉर्न वाजवत नाचण्यास सुरुवात केली. त्यांनी अंगावरील शर्ट काढून रस्त्यावर आरडाओरड केली. धक्कादायक बाब म्हणजे यातील एका तरुणाने तर चक्क अंगातील पँट देखील काढण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
advertisement
खरं तर, नागपुरातील धरमपेठ परिसरात मोठ्या प्रमाणावर पब आणि बार आहेत. त्यामुळे दारुच्या नशेत अशा प्रकारच्या घटना या परिसरात वारंवार घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ताज्या घटनेत देखील तरुणांनी हे कृत्य मद्यधुंद अवस्थेत केल्याचं सांगितलं जातंय. या घटनेचा पुढील तपास सीताबर्डी पोलीस करत आहेत.
