नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेलरोड, शिवाजीनगर येथील अष्टविनायक नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अरविंद मुरलीधर पाटील (वय 58) या व्यक्तीने स्वतःच्या वृद्ध आई यशोदाबाई मुरलीधर पाटील (वय 86) यांची गळा दाबून हत्या केली. अधिक धक्कादायक म्हणजे, हत्या केल्यानंतर अरविंद स्वतःच नाशिक रोड पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
advertisement
आईच्या हत्येचे कारण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद पाटील पोलीस ठाण्यात येऊन म्हणाला, "मी माझ्या वयोवृद्ध आईच्या वृद्धपणाला कंटाळून तिची हत्या केली आहे, मला अटक करा." त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्याला ताब्यात घेत त्याच्या घरी पाहणी केली. तेव्हा घरात यशोदाबाई पाटील यांचा मृतदेह आढळून आला.
आरोपी मुलगा मनोरुग्ण...
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अरविंद उर्फ बाळू पाटील याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. तो विवाहित असून, मानसिक आजारामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तो फक्त आपल्या आईसोबतच राहत होता.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेनंतर परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण पसरले असून, मुलानेच आईचा जीव घेतल्याने नागरिकांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.