ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि क्रूर घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. येथे नुआगाव गावात राहणाऱ्या देबाशीष पात्रा नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी आणि सासू यांची निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर मृतदेह आपल्या घरामागील बागेत पुरले. कोणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपीने खड्ड्यावर केळीचे झाड लावलं होतं.
advertisement
ही घटना 15 जुलै रोजी घडली होती, परंतु गावकऱ्यांनी देबाशीषच्या बागेत नुकत्याच झालेल्या खोदकामाची नोंद घेतल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू करत बागेत जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम केले असता, तेथे दोन कुजलेले मृतदेह सापडले. चौकशी केली असता, देबाशीषने हत्येची कबुली दिली. त्याने सांगितले की, हत्येची योजना त्याने आधीच आखली होती आणि त्यासाठी त्याने आधीच खड्डा खणून ठेवला होता. हत्या केल्यानंतर मृतदेह तिथेच पुरले.
दगडाने ठेचून हत्या; गूढ कायम
देबाशीषने पत्नी आणि सासूला दगडाने ठेचून ठार मारल्याचे सांगितले. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी आणि सासू बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र, नातेवाईकांना त्याच्यावर आधीपासूनच संशय होता.
पुढील तपास सुरू
पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास वेगाने सुरू आहे. आरोपीने पोलिसांसमोर सांगितले की, "मी हत्या करण्यापूर्वी योजना आखली होती आणि खड्डा खणला होता. 15 जुलै रोजी मी दोन लोकांची दगडाने मारून हत्या केली होती. आता मी काहीही सांगण्याच्या स्थितीत नाही." देबाशीष पात्राने आपल्या बेपत्ता तक्रारीत म्हटले होते की, त्याची सासू आणि पत्नी गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलिसांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर देबाशीषला अटक करण्यात आली असून, त्याने हत्येची कबुली दिली आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील तपासाला गती मिळेल.