ही गोष्ट आहे 67 वर्षांच्या रामबीरीची, जिने दिल्ली पोलिसांच्या अनुभवी अधिकाऱ्यांनाही चक्रावून सोडलं आहे. वरून साधीभोळी दिसणारी ही 'आजी' खरं तर दिल्ली-एनसीआरमधील कुख्यात गुंडांना मृत्यूचं सामान म्हणजेच 'बेकायदा शस्त्र' पुरवणारी सर्वात मोठी तस्कर निघाली आहे.
रामबीरी ही मूळची उत्तर प्रदेशातील मेरठची राहणारी. तिचा गुन्हेगारी जगातील वावर आणि काम करण्याची पद्धत एखाद्या प्रोफेशनल गँगस्टरलाही लाजवेल अशी होती. ती मेरठ ते थेट मध्य प्रदेशातील खरगोन आणि इंदूर असा लांबचा प्रवास करायची. पण तिची खासियत म्हणजे ती कधीही मोठी बॅग किंवा जड सामान सोबत ठेवायची नाही.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामबीरीच्या झोळीत फक्त चार पोळ्या आणि पाण्याची एक बाटली असायची. एखाद्या सामान्य वृद्ध महिलेसारखं रेल्वेच्या जनरल डब्यातून ती प्रवास करायची, जेणेकरून कोणत्याही तपास यंत्रणेला तिच्यावर संशय येऊ नये. कोणाला ठाऊक होतं की, याच साध्या वेशाखाली ती 'मृत्यू' घेऊन फिरत आहे.
शकुन वस्ती स्टेशनवर 'गेम' ओव्हर
9 जानेवारी 2026 रोजी रामबीरीचा हा खेळ संपला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला गुप्त बातमी मिळाली होती की, एक वृद्ध महिला शस्त्रांची मोठी खेप घेऊन दिल्लीत येणार आहे. पोलिसांनी सापळा रचला आणि शकुन वस्ती रेल्वे स्थानकावर तिला वेढा घातला.
जेव्हा पोलिसांनी तिची झोळी तपासली, तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. 67 वर्षांच्या या आजींच्या ताब्यातून 4 अत्याधुनिक पिस्तूलं आणि 3 मॅगझिन जप्त करण्यात आली. ती खरगोनहून ही शस्त्रं घेऊन आली होती आणि दिल्लीतील एका मोठ्या गँगला ती विकणार होती.
रामबीरी या व्यवसायात इतकी यशस्वी का ठरली? याचं उत्तर तिच्या वयात दडलं आहे. पोलीस सहसा स्थानकांवर तरुण मुले किंवा संशयास्पद हालचाली करणाऱ्या पुरुषांची झडती घेतात. 67 वर्षांची एखादी आजी संघटित गुन्हेगारीचा भाग असू शकते, असा विचारही पोलिसांनी केला नव्हता. तिचं वयच तिचं सर्वात मोठं 'सुरक्षा कवच' बनलं होतं.
तपासात असं समोर आलं आहे की, रामबीरी ही मेरठमधील एका मोठ्या सिंडिकेटची महत्त्वाची कडी आहे. मध्य प्रदेशातील खरगोन हे बेकायदा शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात आहे. तिथे जाऊन ती शस्त्रं उचलत असे आणि प्रवासादरम्यान भूक लागली की घरून बांधून आणलेल्या त्याच चार पोळ्या खात असे.
रामबीरीची अटक ही सुरक्षा यंत्रणांसाठी डोळे उघडणारी ठरली आहे. गुन्ह्याला आता चेहरा किंवा वय उरलं नाहीये, हेच यातून सिद्ध होतं. 'चाची' सध्या पोलीस कोठडीत आहे आणि तिच्या चौकशीतून मेरठ ते खरगोन दरम्यान पसरलेल्या शस्त्रांच्या या काळ्या कॉरिडॉरचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
