पुणे: विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी या दाम्पत्याच्या मुलाने पोलिसात तक्रार केली आहे. जखमी पत्नीवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
शहराजवळील नगर रस्त्यावरील केसनंद भागात एका महिलेवर तिच्याच पतीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुशीला बिराप्पा खांडेकर (वय 45, रा. लाडबा वस्ती, केसनंद) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, पोलिसांनी तिच्या पतीला बिराप्पा शंकर खांडेकर (वय 50) याला अटक केली आहे.
advertisement
या प्रकरणी पीडितेचा मुलगा समर्थ बिराप्पा खांडेकर (वय 22) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, खांडेकर दाम्पत्य मजुरीचे काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सतत वाद सुरू होते.
आरोपी बिराप्पा हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि त्यामुळे तो वारंवार तिचा छळ करीत होता. सोमवारी झालेल्या वादात त्याचा राग अनावर झाला आणि त्याने पत्नी सुशीलावर काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सुशीलाच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी बिराप्पा याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. शेंडगे करत आहेत.
कल्याणमध्ये भावकीत रक्तरंजित राडा, काकाने पुतण्यावर केले वार
ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या शहाडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या पुतण्यावर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या हल्ल्यात पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्याचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काका आपल्या पुतण्यावर वार करताना दिसत आहे.
धाकटे शहाड कोळीवाडा परिसरात शनिवारी संध्याकाळी घडली. जमिनीच्या वादातून हा राडा झाल्याची माहिती आहे. या हाणामारीत काकाने आपल्या पुतण्याला लोखंडी टोकदार हत्याराने मारहाण केली. या घटनेत एकूण तीन जण जखमी झाले आहेत. यातील एकजण गंभीर आहे.