कशी झाली फसवणूक?
राज्यातील हजारो जणांना गुंतवणुकीवर अल्पावधीत मोठे रिटर्न देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार एक ते दहा लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना तीन टक्के, 11 ते 25 लाख गुंतवणाऱ्यांना चार टक्के, तर 25 लाख रुपयांहून अधिकची गुंतवणूक केल्यास पाच टक्के परतावा आणि कंपनीत भागीदारी सांगण्यात आले. त्यानुसार 11 हजार गुंतवणूकदारांची 1200 कोटी रुपयांची फसवणूक झाली. यामध्ये ठाण्यातील 432 गुंतवणूकदार असून त्यांची 72 कोटींची फसवणूक झाली.
advertisement
सरकारी प्रकल्पांत मोठे कंत्राट मिळण्याचा दावा
ट्रेड विथ जॅझ (टीडब्ल्यूजे) असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवले होते. तसेच सरकारी प्रकल्पात मोठे कंत्राट मिळणार असल्याचा दावा करत अनेकांना जाळ्यात ओढले होते. 9 फेब्रुवारी 2024 ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान या टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक समीर नार्वेकर, अमित बालकम, संकश घाग, घारघर येथील व्यवस्थापक सागर कदम आणि ठाण्यातील वागळे इस्टेट येथील व्यवस्थापक सौरव बोंडे यांनी राज्यातील 16 विविध जिल्ह्यांत कंपनीचे काम सुरू केले होते. यामध्ये 11 हजार जणांकडून परताव्याचे आमिष दाखवून पैसे गोळा केले आणि 1200 कोटी रुपयांचा अपहार केला होता. याबाबत तक्रार ठाणे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे आली होती.
तिघांना गुजरातमधून अटक
नार्वेकर यांच्या कंपनीने राज्यात 1200 कोटींची फसवणूक केली. ही बाब पुढे आल्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपास सुरू झाल्यापासूनच पोलिसांना गुंगारा देणाऱ्या समीर नार्वेकर (35), त्याची पत्नी नेहा (36) आणि अमित बालम (37) यांना 29 जानेवारी रोजी गुजरातमधून अटक केली.
पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अल्पमुदतीत श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडू नये. जादा नफ्याचे प्रलोभन दाखविणाऱ्या योजना आणि तशा प्रकारच्या कंपन्यात गुंतवणूक करू नये. या योजना फसव्या असू शकतात. ज्यांची ट्रेड विथ जॅझ सारख्या कंपनीत गुंतवणूक करून फसवणूक झाली आहे, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
