नैनीतालच्या जिल्हाधिकारी वंदना सिंह यांनी या बाबत माहिती दिली आहे. सिंह म्हणाल्या, ‘प्रशासनाकडून या मदरशाला आधीच अतिक्रमणविरोधी नोटीस बजावण्यात आली होती. तेव्हा मशीद-मदरसा या घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर दगड नव्हते. अतिक्रमण हटवल्यानंतर अर्ध्याच तासात हिंसाचाराला सुरुवात झाली. हिंसाचारावेळी अचानकच इतके दगड तिथे कुठून आले? हिंसाचार सुरू झाल्यावर आजूबाजूच्या घरांतून पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक झाली, जणू दगडांचा पाऊसच पडला.’
advertisement
‘हल्द्वानी येथील हिंसाचारामागे एक मोठा कट आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील अनेक ठिकाणी अतिक्रमणविरोधी कारवाया करण्यात आल्या आहेत. सगळ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर सुनावणीसाठी वेळही देण्यात आला. काहींनी हायकोर्टात धाव घेतली. काहींना मुदत देण्यात आली तर काहींना मात्र मुदत नाकारण्यात आली. ज्या प्रकरणांमध्ये मुदतवाढ नाकारण्यात आली तिथे पीडब्ल्यूडी आणि नगर पालिका यांनी अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. मशीद-मदरसा यांबाबत काही वेगळी प्रक्रिया नव्हती आणि कोणत्याही मालमत्तेला विशेष लक्ष्यही करण्यात आलेलं नव्हतं,’ असंही वंदना सिंह यांनी स्पष्ट केलं.
या कारवाईनंतर झालेला हिंसाचार ही घटना हा पूर्वनियोजित कट असल्याचे काही पुरावे प्रशासनाकडून सादर करण्यात आले आहेत. कारवाईनंतर अर्ध्या तासाने आग लावली गेली. मशिदी शेजारच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात दगड गोळा करून ठेवण्यात आले होते. पोलीस स्थानकात उभ्या गाड्यांना आग लावण्यात आली. संतप्त जमावाने पेट्रोल बॅाम्बने पोलीस स्थानकावर हल्ला केला. पोलिसांना जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न या दंगलखोरांनी केला. बाजूच्या घरांच्या छतांवर दगड गोळा करून ठेवेलेले होते. या निरीक्षणांवरून हा हिंसाचर कट असल्याचं सिद्ध होत असल्याचं प्रशासनाने सांगितलं.
हल्द्वानीमध्ये गुरुवारी झालेल्या या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला आहे. तीन जण गंभीर जखमी आहेत. अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बनभूलपुरा क्षेत्रात हिंसेनंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कर्फ्यू लावण्यात आला. तसेच दंगल भडकवणाऱ्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जागोजागी पोलीस तैनात करण्यात आल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.