विशाल दशरथ चौधरी असं हल्ला झालेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तो अनेकदा एमपीडीए कायद्यांतर्गत तुरुंगातही जाऊन आला आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याने अमळनेर परिसरात आपले अनेक शत्रू निर्माण केले होते. दरम्यान, तुरुंगातून सुटल्यानंतर त्याच्यावर सोमवारी हल्ला झाला आहे. याबाबतचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल चौधरी हा 1 फेब्रुवारी रोजी एमपीडीएतून सुटून आला आहे. यापूर्वी देखील त्याच्यावर अशाप्रकारची कारवाई झाली होती. दुसऱ्यांदा एमपीडीएतून सुटका झाल्यानंतर ३ फेब्रुवारीला तो बाजार समितीच्या आवारात कामासाठी आला होता. दरम्यान, त्याच्यावर सात ते आठ जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला करत मारहाण केली. या हल्ल्यात विशाल चौधरी याच्या डोक्यावर तीन ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर तो घटनास्थळी बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
या हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी दाखल केले. पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तिथून पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठी धावपळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले आहेत. जखमीच्या जबाबानंतर गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.