सचिन आबासाहेब तवर असं अटक केलेल्या २१ वर्षीय आरोपी प्रियकराचं नाव आहे. तर करिष्मा अमोल तुपे असं आत्महत्या करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचं नाव आहे. मागील काही महिन्यांपासून करिष्मा आणि सचिन प्रेम संबंधात होते. सचिनने करिष्माला लग्नाचं वचन दिलं होतं. पण ऐनवेळी सचिनने दगा दिला. त्याने लग्न करण्यास नकार दिला. सचिनचा या निर्णय करिष्माच्या जिव्हारी लागला आणि ती नैराश्याच्या गर्तेत गेली.
advertisement
यानंतर ८ जुलै रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास करिष्माने खोलीत कुणी नसल्याचं पाहून गळफास घेऊन आयुष्याचा भयावह शेवट केला. या घटनेची माहिती मिळताच कडेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच करिष्माने आत्महत्या का केली? एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास सुरू केला.
यावेळी मयत करिष्मा हिचे सचिनसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत खोलात जाऊन तपास केला असता सचिनने लग्नास नकार दिल्याच्या कारणातून तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आलं. यानंतर कडेगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मयत तरुणीचे वडील अमोल केशव तुपे (रा. तोंडोली) यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.