मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती 14 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर, संघर्षावर आणि प्रेरणादायक जीवनावर गाणी लिहिणारे, गाणारे अनेक कलाकार आज कार्यरत आहेत. समाजप्रबोधनासाठी या कलाकारांनी मोठे योगदान दिले आहे. अशीच एक गायिका सुवर्णा खांडेकर यांच्या संगीत प्रवासाबद्दल लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊया.
advertisement
सुवर्णा खांडेकर यांच्या गायनाची सुरुवात त्यांच्या आईकडून झाली. त्यांच्या आईचं शिक्षण जेमतेम पाचवीपर्यंतच झालं होतं, पण बाबासाहेबांविषयी असलेल्या प्रेमामुळे त्यांनी स्वतःच गाणी आणि चारोळ्या लिहिल्या. लहानपणी सुवर्णा आईने लिहिलेली गाणी ऐकायच्या, गुणगुणायच्या आणि याच गोष्टीमधून त्यांच्यात संगीताची आवड निर्माण झाली.
Bhim Shahir: बाबासाहेबांकडून मिळाली प्रेरणा, ऊसतोड कामगाराचा मुलगा आता महाराष्ट्र गाजवतोय!
लोकप्रिय गायन स्पर्धेत भाग
सुवर्णा यांच्या भावाने त्यांना 2009 साली 'सा रे ग म प' या लोकप्रिय गायन स्पर्धेत भाग घ्यायला प्रवृत्त केलं. या स्पर्धेत सुप्रसिद्ध गायिका उर्मिला धनगरकर त्यांच्या स्पर्धक होत्या. सुवर्णा पहिल्या तीन फेऱ्यांपर्यंत पोहोचल्या, मात्र संगीताचं औपचारिक शिक्षण नसल्यामुळे त्या तिसऱ्या फेरीतून बाहेर पडल्या. त्या वेळी परीक्षक म्हणून शाहीर विठ्ठल उमप होते. त्यांनी सुवर्णा यांच्या आवाजातील ताकद ओळखली आणि त्यांना गाण्याचे शिक्षण घ्यायला सांगितले.
शाहीर उमप यांचा सल्ला
शाहीर विठ्ठल उमप यांना मला बोलावून घेतले. तसेच आपल्याकडं गाणं शिकण्यास सांगितलं. सुरुवातीला त्यांनी गाण्याचे धडे दिले. परंतु, माझा आवाज लोकगीतांपेक्षा शास्त्रीय गाण्यांसाठी अधिक योग्य आहे. त्यामुळे मला बाबादास तुपे यांच्याकडे गाणं शिकण्यासाठी पाठवल्याचं सुवर्णा सांगतात.
दरम्यान, आज सुवर्णा खांडेकर वेगवेगळ्या कार्यक्रमांत बाबासाहेबांवरील गाणी सादर करतात. त्यांच्या गाण्यात भक्ती आणि भाव यांचा सुरेख संगम दिसतो. त्या लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची गाणीही गातात. विशेष म्हणजे त्यांची मुलगीही आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत शिकते आहे.