अशातच या फिल्ममध्ये 'जमील जमाली'ची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. 'धुरंधर' फिल्ममधील "बच्चा है तू मेरा..." हा डायलॉग सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. मात्र, त्यांच्या एका जुन्या वक्तव्यामुळे त्यांना जाहीर माफी मागावी लागली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सध्या राकेश बेदी यांच्या कामाचं तुफान कौतुक होत आहे. अशातच त्यांची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे, ज्यात त्यांनी बोलण्याच्या ओघात त्यांनी 'हरिजन' या शब्दाचा वापर केला होता. आपल्या देशात या शब्दाचा वापर करण्यावर कायदेशीर बंदी आहे. ही गोष्ट आझाद समाज पार्टीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष कैलाश जैसवार यांनी निदर्शनास आणून देताच वादाला तोंड फुटलं. दरम्यान, हा वाद वाढत असल्याचं लक्षात येताच राकेश बेदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत नम्रपणे माफी मागितली आहे.
advertisement
व्हिडीओ शेअर करत राकेश बेदींनी मागितली माफी
राकेश बेदी यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय, "नमस्कार, मी राकेश बेदी. काही महिन्यांपूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याबद्दल बोलताना दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी केलेल्या मेहनतीचा उल्लेख केला होता. त्या ओघात माझ्याकडून 'हरिजन' हा शब्द वापरला गेला. मला खरंच ठाऊक नव्हतं की भारतात या शब्दाच्या वापरावर बंदी आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. जर माझ्या शब्दांमुळे कोणाचं मन दुखावलं असेल, तर मी मनापासून क्षमा मागतो."
राकेश यांनी दिलेली प्रांजळ कबुली आणि कोणताही अहंकार न बाळगता मागितलेली माफी यामुळे सध्या त्यांचं कौतुक होत आहे. सध्या राकेश बेदी त्यांच्या फिल्मच्या यशाचा आनंद घेत आहे. या फिल्मने १८ दिवसांमध्ये १६०० कोटींहून अधिकची कमाई केली असून लवकरच ही फिल्म अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चा रेकॉर्ड मोडेल यात शंका नाही.
