'महाराष्ट्रातील हास्यजत्रा' या कार्यक्रमाने अनेक हास्यवीरांना ब्रेक दिला आहे. कोणाचं कॉलेजमध्ये असताना एकांकिका करत अभिनेता होण्याचं स्वप्न साकार झालंय तर कोणाचं हास्यजत्रेच्या माध्यमातून स्वत:चं घर झालंय. कोणी पहिल्यांदाच परदेशी गेलंय तर कोणाचं रुपेरी पडद्यावर झळकण्याचं स्वप्न साकार झालंय. अशा हास्यविरांच्या संघर्षमय खऱ्या स्टोऱ्या प्रेक्षकांना आगामी पॉडकास्टमध्ये पाहता येतील.
लवकरच पूर्ण होणार 'महाराष्ट्रातील हास्यजत्रा'चे 1000 एपिसोड
advertisement
सोनी मराठीचे सीनियर व्हाइस प्रेसिडंट अमित फाळके न्यूज 18 मराठीसोबत संवाद साधताना म्हणाले, "हास्यजत्रा आता 1000 व्या एपिसोडपर्यंत पोहोचत आहे. हजाराव्या एपिसोडपर्यंत हास्यजत्रा पोहोचत असताना सोनी मराठीच्या टिमने हे ठरवलं की, आतापर्यंतचा हास्यजत्रेचा सगळा प्रवास प्रेक्षकांसमोर आणावा. हास्यजत्रेचे निर्माते, दिग्दर्शक, हास्यजत्रेमध्ये काम करत असलेले सगळे लेखक, कलाकार यांच्याबरोबर ‘MHJ Unplugged’ या निमित्ताने गप्पा माराव्यात आणि त्यांच्या आयुष्याबद्दल, हास्यजत्रेच्या प्रवासाबद्दल काहीतरी वेगळं जे आतापर्यंत लोकांनी ऐकलं नाही ते या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर यावं".
अमित फाळके पुढे म्हणाले,"‘MHJ Unplugged’च्या निमित्ताने सूत्रसंचालक म्हणून एक नवी जबाबदारी आवडीने पार पाडायला मी सज्ज आहे. आशा करतो की, सर्व लोकांना ही संकल्पना आणि हा कार्यक्रम आवडेल. मराठी दूरचित्रवाणी माध्यमावरील कार्यक्रमासाठीचा हा वेगळा प्रयत्न आहे. हास्यजत्रेतील कलाकार, लेखक, दिग्दर्शकांबद्दल आणखी माहिती घेण्याची प्रेक्षकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. सर्वच हास्यवीरांसोबत बोलायला मला खूप मजा येत आहे. पडद्यामागे आम्ही वेगवेगळ्या गंमती-धमाल करत असतो. यानिमित्ताने काही खऱ्या गोष्टी लोकांसमोर शेअर करता येतील."
येत्या 11 सप्टेंबरपासून प्रत्येक गुरुवारी एक नवा चेहरा आणि नवे किस्से ऐकायला मिळणार आहेत. सोनी मराठीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा पॉडकास्ट पाहता येईल.