नुकतंच श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर हे मुंबईतील एका श्री स्वामी समर्थ मठातून एकत्र बाहेर पडताना दिसले. त्यावेळी श्रेयसच्या हातात एक कागदांचा गठ्ठा होता, जो त्यांच्या आगामी प्रोजेक्टची स्क्रिप्ट असल्याचं म्हटलं जात आहे. हे तिघेही हसत-खेळत पापाराझींसमोर फोटोसाठी पोज देताना दिसले.
पुन्हा एकदा तीच टीम एकत्र?
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. श्रेयस आणि प्रार्थनाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेत संकर्षण कऱ्हाडे, काजल काटे, मोहन जोशी, शीतल क्षीरसागर आणि अतुल महाजन अशी तगडी स्टार कास्ट होती. आता हे तिघे पुन्हा एकदा त्याच मालिकेचा सिक्वेल घेऊन येणार की, मग एखाद्या नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करणार, असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. दरम्यान, या कलाकारांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे चाहते आता त्यांच्या पुढील प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.