सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या मोशन पोस्टरने चांगलीच खळबळ माजवली आहे. पोस्टरवरील ती टॅगलाईन वाचली की अंगावर काटा येतो, "ना चेहरा, ना निमित्त, चार खून, शून्य पुरावे!" गुन्ह्याचा तपास करण्यासाठी काहीतरी धागादोरा लागतो, पण जिथे पुराव्यांचा पत्ताच नाही, तिथे सत्य कसं बाहेर येणार? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रेक्षकांना नव्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
advertisement
दिग्गजांची फौज अन् 'केस नं. ७३' ची गूढ कथा
लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज यांची निर्मिती असलेला हा चित्रपट जानेवारी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यातील तगडी स्टारकास्ट. अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर आणि पियुष आपटे असे अभिनयातील दिग्गज कलाकार एकत्र आल्यामुळे या केसबद्दलची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. प्रत्येक पात्राच्या मनात काहीतरी दडलंय आणि प्रत्येक सीन एका नवीन प्रश्नाला जन्म देतो, अशी या चित्रपटाची मांडणी आहे.
दिग्दर्शकाचा नवा प्रयोग
चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी या रहस्यपटाबद्दल बोलताना एक वेगळा दृष्टिकोन मांडला. ते म्हणतात, "हा चित्रपट केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणार नाही, तर त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला आव्हान देईल. ही अशी कथा आहे जिथे प्रत्येक प्रेक्षक स्वतःला एका डिटेक्टिव्हच्या भूमिकेत अनुभवेल." निर्माते शर्वरी सतीश वटक आणि डॉ. मिलिंद आपटे यांना विश्वास आहे की, मराठी चित्रपटसृष्टीतील रहस्यपटांचा दर्जा हा चित्रपट नक्कीच उंचावेल.
पडद्यामागचे शिलेदार
एखादा थ्रिलर चित्रपट यशस्वी होण्यासाठी त्याचं संगीत आणि छायांकन अत्यंत महत्त्वाचं असतं. डॉ. ऋचा अमित येनुरकर यांची धारदार पटकथा आणि निनाद गोसावी यांचं कल्पक छायांकन या चित्रपटाची दृश्यं अधिक प्रभावी आणि रहस्यमयी बनवतात. मंदार चोळकर यांच्या गीतांना अमेय मोहन कडू यांनी दिलेलं संगीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारं आहे. सहनिर्माते प्रविण अरुण खंगार यांनीही या प्रकल्पासाठी मोलाची साथ दिली आहे.
