आज सकाळपासून एन. डी. स्टुडिओत नितीन देसाई यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आज एनडी स्टुडिओत काम करणारा प्रत्येक जण आपल्या मालकाला अखेरचा निरोप देण्यासाठी आला आहे. या अत्यंत भावुक क्षणी प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत. आज संध्याकाळी नितीन देसाई यांच्यावर एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नितीन देसाई यांच्या दोन्ही मुली, मुलगा पत्नी, आई साऱ्यांसाठी हा मोठा धक्का आहे. आता त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान नितीन देसाईंच्या लेकीचा एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
नितीन देसाई यांच्यावर काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या लेकीनं त्यांना शेवटच्या क्षणी सुद्धा साथ दिली. नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्काराचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या मुलीनं नितीन त्यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचं दिसतंय. त्यांची मुलगी आपल्या लाडक्या बाबांना निरोप देताना अत्यंत भावुक झालेली दिसतेय. हा क्षण पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले आहेत. त्यांना शेवटच पाहताना सगळ्यांचा भावनांचा बांध फुटला आहे.
नितीन देसाईंना शेवटच्या निरोप देण्यासाठी अनेक राजकीय मंडळींसोबत मराठी कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. नितीन देसाईंच्या अंत्यसंस्कारासाठी एन. डी. स्टुडिओत अभिनेत्री मानसी नाईक, अभिनेता सुबोध भावे, अभिजित केळकर आणि निखिल साने उपस्थित होते.
नितीन देसाई यांचा जन्म 9 ऑगस्ट 1965 रोजी कोकणातील दापोली या ठिकाणी झाला. प्रसिद्ध कला दिग्दर्शक, निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. अनेक सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं होतं. परिंदा, डॉन, माचिस, देवदास, लगान सारखे अनेक भव्यदिव्य सिनेमांसाठी त्यांनी काम केलं. आता नितीन देसाईंच्या निधनानंतर चित्रपट सृष्टीतील एका पर्वाचा अंत झालाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
