नितीन देसाई यांनी आजवर हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टीत कौतुकास्पद कामगिरी करत अनेक पुरस्कार देखील पटकावले आहेत. त्यांच्या करिअरची सुरुवात 'तमस' या मालिकेने झाली होती. त्यानंतर त्यांनी '1942 अ लव्ह स्टोरी', हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ सारख्या मोठ्या चित्रपटांसाठी काम केलं होतं. तर मराठीमध्ये 'राजा शिवछत्रपती', 'अजिंठा' या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. मनोरंजन सृष्टीतील त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे ५२ एकर जागेवर त्यांनी उभारलेला एन. डी. स्टुडिओ. हे आहे. आता आज याच ठिकाणी नितीन देसाईंना अखेरचा निरोप दिला जाणार आहे.
advertisement
नितीन देसाई यांना अजून अनेक प्रोजेक्टवर काम करायचं होतं. पण त्यांनी आत्महत्येसारचं पाऊल उचलल्यामुळे त्यांची काही स्वप्न अपूर्णच राहिली. देसाई यांचा जवळचा मित्र प्रसिद्ध कोरिओग्राफर सुभाष नकाशे यांनी त्यांच्या अपूर्ण स्वप्नांविषयी खुलासा केला आहे.
लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत नकाशे म्हणाले, 'मी नितीन यांच्याबरोबर राजा शिवछत्रपती या मालिकेपासून म्हणजे २००६ पासून काम करत होतो. अनेक प्रोजेक्टवर आम्ही सोबत काम केलं. त्यांच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर मला विश्वासच बसला नाही. मी सुन्न झालो होतो. कारण मार्चमध्ये त्यांच्या मुलीचं लग्न याच स्टुडिओमध्ये झालं होतं. तेव्हा त्या लग्नाच्या प्लॅनिंगमध्ये आमचा सगळ्यांचा सहभाग होता. आम्ही अनेकदा त्यांच्या पुढच्या स्वप्नांवरही चर्चा केली होती. त्यांना मोठं मोठे म्युझिकल शो करायचे होते. डान्स इन्स्टिटयूट करायचे होते. या स्टुडिओत आम्ही डान्स इन्स्टिटयूट तयार करणार होतो. अनेकांना डान्स शिकवून त्यांना इंडस्ट्रीत काम मिळावं असं त्यांच स्वप्न होतं.' असा खुलासा नकाशे यांनी केला आहे.
यावेळी बोलताना सुभाष नकाशे म्हणाले, 'मी जेव्हा जेव्हा या स्टुडिओत यायचो तेव्हा जाताना खूप काही नवीन शिकून जायचो, ऊर्जा घेऊन जायचो. पण आज इथे उभं राहिल्यानंतर इथला आत्माच हरवल्याची जाणीव होत आहे.'' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितीन देसाई यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं होतं. त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्यामागे हेच कारण असल्याचं ही सांगितलं जात आहे.
