नितीन देसाई 2 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता दिल्लीहून मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओ येथे पोहोचले. स्टुडिओमध्ये पोहोचताच त्यांनी आतमध्ये असलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर ते सलमान हवेली नावाच्या बंगल्यात गेले. सलमान खान बऱ्याच सिनेमांच्या शुटींगनंतर त्या हवेलीत राहत होता म्हणून त्याला त्यांना सलमान हवेली असं नाव दिलं होतं. यात हवेलीमध्ये नितीन देसाई सध्या राहत होते.
advertisement
नितीन देसाई रात्री 3 वाजता स्टुडिओतील काही भागात फिरले. यावेळ त्यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक योगेश ठाकूर होते. योगेश ठाकूरला घेऊन नितीन देसाई 'मराठी पाऊल पडते पुढे'च्या जुन्या सेटवर गेले. संपूर्ण परिसर फिरल्यानंतर त्यांनी तो स्टुडिओ बंद करायला सांगितला आणि त्याची चावी स्वत:कडे ठेवून घेतली. त्यानंतर सहकारी योगेश ठाकूरला घेऊन देसाई सलमान हवेतील आले. ठाकूर यांच्याकडे त्यांनी व्हॉइस रेकॉर्डर दिला. व्हॉइस रेकॉर्डरमधलं संभाषण ऐकून सकाळी ते वकिलाला आणि बहिणीला पाठव असं त्यांनी ठाकूर यांना सांगितलं. ठाकूर तिथून निघून गेले. त्यानंतर देसाई यांनी त्यांना 20 मिनिटात पुन्हा स्टुडिओमध्ये बोलावलं आणि आणखी काहीतरी रेकॉर्ड करायचं आहे असं सांगितलं. तू सकाळी ऑफिसमधून रेकॉर्डर घेऊन जा असं सांगून ठाकूर यांना परत पाठवलं.
सकाळी योगेश ठाकूर स्टुडिओमध्ये गेले तेव्हा सलमान हवेलीमध्ये नितीन देसाई नव्हते. त्यांनी त्या रेकॉर्डरमधील ऑडिओ कॉम्प्युटरवरून मोबाईलमध्ये घेऊन वकिल आणि बहिणीला पाठवले. त्यानंतर त्यातील पहिली ऑडिओ क्लिप ऐकून योगेश ठाकूर यांना धक्का बसला. 'लालबागच्या राजाला माझा शेवटचा नमस्कार' असं त्या क्लिपमध्ये योगेश यांनी ऐकलं. यानंतर ठाकूर यांनी स्टुडिओमध्ये धाव घेतली आणि पाहिल्यानंतर नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं. 'माझे अंत्यसंस्कार एनडी स्टुडिओमध्ये करा' अशी शेवटची इच्छा त्यांनी एका कागदावर लिहून ठेवली होती.
हेही वाचा - Nitin Desai : मोदींनाही दिली होती नितीन देसाईंना ऑफर; भेटीच्या त्या 45मिनिटात नेमकं काय घडलं?
महिन्याभरापूर्वीच केलं होतं आत्महत्येचं प्लानिंग
नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यासाठी जी दोरी वापरली ती त्यांनी महिन्याभरापूर्वीच रंगमंचावर टांगून ठेवली होती. याबद्दल त्यांना सहकाऱ्यांनी प्रश्न विचारले असता त्यांनी हा वास्तुशास्त्राचा भाग असल्याचं सांगितलं होतं. आत्महत्या करण्याआधी ते त्या ठिकाणी गेले होते आणि तिथली व्यवस्थित पाहणी केली होती. आत्महत्येसाठी वापरलेली दोरी, बाजूला वर चढण्यासाठी असणारी शिडी आणि आत्महत्येच्या ठिकाणी दोरीच्या साहाय्याने बनवलेली धनुष्यबाणाची प्रतिकृती हे सगळं त्यांनी आधीच बनवून ठेवलं होतं. यावरून त्यांनी फार आधीच त्यांच्या आत्महत्येचा विचार केला होता असं दिसून येत आहे.
टप्प्या टप्प्याने केले होते ऑडिओ रेकॉर्ड
नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्याआधी काही ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. 11 ऑडिओ रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागल्या असून त्या फॉरेंसिक चाचणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. नितीन देसाई यांनी हे सगळे ऑडिओ टप्प्याटप्प्याने रेकॉर्ड केले होते. रेकॉर्ड केलेल्या ऑडिओची वेळ ही 20 आणि 12 मिनिटं इतकी आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये त्यांनी स्वत:चा जीवनप्रवास मांडला आहे. रंगमंचावरील कामाची सुरूवात, त्यानंतर मिळालेलं यश याबद्दल त्यांनी विस्तृतपणे सांगितलं आहे. त्याचप्रमाणे एनडी स्टुडिओवर त्यांचं जीवापाड प्रेम असल्याचं देखील नमूद केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी स्टुडिओ कसा उभा केला, संपत्ती कशी उभारली, आलेल्या संकटांचा सामना कसा केला या सगळ्याचा उल्लेख त्यात आहे. काही कंपनींचा उल्लेख त्यांनी केला आहे. कंपनीकडून घेतलेलं कर्ज आणि त्यानंतर कर्जवसुलीची कार्यपद्धत आणि प्रक्रिया यावर आक्षेप त्यांनी नोंदवला आहे. त्यांच्या ऑडिओ क्लिपचा शेवट हा पाऊले चालती पंढरीची वाट असा आहे.
