अभिनेता आमिर खान, सुबोध भावे, मानसी नाईक, कोरिओग्राफर सुभाष नकाशे, आदेश बांदेकर यांच्यासह अनेक कलाकार नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थितीत होते. लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सर्वेसर्वा सुधीर साळवी देखील या ठिकाणी उपस्थित होते.
नितीन देसाई यांचा मृतदेह मुंबईच्या जे जे रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर एनडी स्टुडिओमध्ये त्यांचं पार्थिव आणण्यात आलं. जोधा अकबरच्या सेटवर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आलं होतं. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत अनेक कलाकार तसेच राजकीय मंडळींनी या ठिकाणी येत नितीन देसाई यांचं अंत्यदर्शन घेतलं. नितीन देसाई यांना शेवटचं पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. अत्यंत जण अंत:करणानी नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देण्यात आला. एनडी स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी साश्रू नयनांनी आपल्या मालकाला अखेरचा निरोप दिला.
advertisement
नितीन दादांचं जाणं म्हणजे आमचं सगळं काही संपणं, अशी भावना एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाईंबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ज्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई हे नाव मोठं झालं. त्याच कर्मभूमीत आज त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नितीन देसाई यांच्या निधनानं संपूर्ण एनडी स्टुडिओ शांत झाला.
हेही वाचा - Nitin Desai Death : नितीन देसाईंनी आधीच ठरवला होता त्यांचा शेवट? मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं?
‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘परिंदा’, ‘डॉन’, सारख्या भव्य सिनेमांचे सेट नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारले होते. इतकंच नाही तर अनेक सिनेमे त्यांनी केलेत. कलाकार सिनेमाचं शुटींग संपवून पॅक अप झाल्यानंतरही सेटवर थांबून राहायचे. नितीन देसाई यांनी साकारलेल्या भव्य सेटवरून कलाकारांचा पाय निघत नसे. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेले नितीन देसाई यांनी ना केवळ मराठी तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये देखील आपलं नाव कमावलं होतं. अनेक नव्या कलाकृती ते प्रेक्षकांसाठी घेऊन येणार होते. मात्र त्यांच्या अकाली जाण्यानं संपूर्ण सिनेसृष्टी हळहळून गेली आहे.
2003 साली तयार करण्यात आलेल्या या एनडी स्टुडिओला नुकतील 20 वर्ष पूर्ण झालीत. एकेकाळी नितीन देसाई या स्टुडिओमध्ये एकाच वेळी 28 प्रोजेक्टवर काम करायचे. आजवर त्यांनी 198 हून अधिक सिनेमे 200 हून अधिक टेलिव्हिजन मालिका आणि 350 हून अधिक गेम शोसाठी कलादिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
