अपूर्वाने तनुज गोवलकरशी बांधली लग्नगाठ
अपूर्वाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत आपला जोडीदार तनुज गोवलकर याची जगाशी ओळख करून दिली आहे. तिने केवळ फोटोच शेअर केले नाहीत, तर आपल्या नावापुढे 'गोवलकर' हे आडनाव जोडून एका नव्या प्रवासाची ग्वाही दिली आहे. अपूर्वाने आपल्या पोस्टमध्ये अत्यंत भावूक शब्दात आपल्या भावना मांडल्या आहेत.
advertisement
अपूर्वाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "१४ फेब्रुवारी २०२६ - ही तारीख आता आमची कायमची झाली आहे. आयुष्यभर साथ देणाऱ्या एका नवीन प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे. खूप संघर्ष पाहिला, आयुष्य कसं असतं हे अनुभवलं, पण प्रेमावरचा विश्वास मी कधीच ढळू दिला नाही. वादळानंतर देवाने मला जी शांतता आणि सोबत दिली, ती म्हणजे तनुज! व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मला माझं घर सापडलं."
प्रेमाला दिला दुसरा चान्स
अपूर्वाचं हे दुसरं लग्न आहे. तिने आपल्या पहिल्या लग्नातील कटू अनुभव आणि त्यानंतर झालेला मानसिक त्रास यावर अनेकदा मुलाखतींमधून भाष्य केलं होतं. पण "योग्य वेळ आणि योग्य माणूस भेटल्यावर नक्की विचार करेन," असंही ती नेहमी म्हणायची. अपूर्वाने तनुजसोबतचं हे नातं अत्यंत समजूतदारपणाने आणि एकमेकांबद्दलच्या आदराने स्वीकारलं आहे. तिने आपल्या पोस्टच्या शेवटी 'Mrs. Apurva Tanuj Govalkar' असं लिहित आपल्या आनंदाला वाट करून दिली आहे.
कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
अपूर्वाच्या लग्नाची बातमी कळताच सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. बिग बॉस मराठीमधील तिचे सहकारी असोत किंवा मालिकेतील सहकलाकार, सर्वांनीच तिला कमेंट्स सेक्शनमधून प्रेम दिलं आहे. अपूर्वा आता खऱ्या अर्थाने आनंदी दिसत असून, तिची ही नवी इनिंग यशस्वी होण्यासाठी चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
