प्रिया मराठेच्या अकाली निधनामुळे मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. प्रियाच्या जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात हे वृत्त समोर आल्यानंतर संपूर्ण मराठी इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
प्रिया मराठे शेवटची पोस्ट
श्रीकांत मोघे यांची सून आणि अभिनेता शंतनू मोघेची पत्नी असलेली प्रिया मराठे गेल्या काही महिन्यांपासून आजारपणामुळे सोशल मीडियावर विशेष सक्रिय नव्हती. तिने शेवटची इंस्टाग्राम पोस्ट 11 ऑगस्ट 2024 रोजी केली होती, ज्यामध्ये शंतनूसोबतचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांचे मन जिंकले होते. प्रियाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने नवरा शंतनूसोबत जयपूर ट्रीपचे काही फोटो शेअर केले होते. यामध्ये दोघेही मस्त आनंदी दिसत आहेत. मात्र दुर्देवाने ही पोस्ट प्रियाची अखेरची ठरली.
दरम्यान, प्रिया मराठेने 2006 साली ‘या सुखांनो या’ मालिकेतून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ती सलग मराठी मालिकांमध्ये दिसली. ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ अशा लोकप्रिय मालिकांमधून तिने घराघरात आपली ओळख निर्माण केली. फक्त सकारात्मकच नाही तर नकारात्मक भूमिका साकारूनही तिने प्रेक्षकांची दाद मिळवली.
मराठीसह हिंदी मालिकांमध्येही तिने ठसा उमटवला. ‘पवित्र रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकांमधून त्यांचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. कॉमेडी सर्कससारख्या शोमधून प्रियाने आपली विनोदी शैलीही सादर केली. याशिवाय ‘विघ्नहर्ता महागणपती’ आणि ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ या चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका केल्या.
