हिंदू आणि बौद्ध धर्माचे प्राबल्य
तिसऱ्या शतकापर्यंत काश्मीरमध्ये पूर्णपणे हिंदू धर्म, त्यातही शैव संप्रदायाचे प्राबल्य होते. येथील लोक भगवान शंकराचे उपासक होते. काश्मिरी ब्राह्मण हे ज्ञान आणि कलेच्या क्षेत्रात अग्रेसर होते. सम्राट अशोकाच्या काळात आणि नंतर येथे बौद्ध धर्माचाही मोठा प्रभाव वाढला. काश्मीरमध्ये अनेक बौद्ध स्तूप उभारले गेले. असे असले तरी बहुसंख्य लोकसंख्या हिंदूच होती. प्रसिद्ध काश्मिरी ब्राह्मण कवी कल्हण यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या 'राजतरंगिणी' या ग्रंथात काश्मीरच्या प्राचीन राजांचा आणि तत्कालीन समाजाचा विस्तृत इतिहास मिळतो. ज्यात बौद्ध धर्माचाही उल्लेख आहे.
advertisement
इस्लामचा प्रवेश आणि प्रसार
या स्थितीत बदल होण्याची सुरुवात साधारणपणे 11 व्या शतकाच्या आसपास झाली. जेव्हा इस्लामी शासकांची सत्ता भारताच्या सीमेपर्यंत पोहोचली. महमूद गझनवीने त्या काळात भारतावर अनेक हल्ले केले. पण काश्मीरच्या दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे आणि तेथील शक्तिशाली राजवटीमुळे तो काश्मीरपर्यंत पोहोचू शकला नाही. यानंतर काही प्रमाणात प्रभाव दिसू लागला. परंतु मोठ्या प्रमाणावरील बदल 14 व्या शतकात घडला.
शाह मीर राजवंश आणि सिकंदर बुतशिकन
शाह मीर नावाच्या एका व्यक्तीने 14 व्या शतकात काश्मीरवर आपले राज्य स्थापन केले. शाह मीरच्या मूळ वंशाबद्दल इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मते आहेत. काही जण त्याला तुर्क किंवा अफगाण वंशाचा मानतात. तर एक मोठा वर्ग असा दावा करतो की त्याचा जन्म काश्मीरमधील एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता आणि त्याने नंतर इस्लाम स्वीकारून हळूहळू लष्करी ताकद वाढवत सत्ता काबीज केली. शाह मीरने काश्मीरमध्ये 'शाह मीर वंशा'ची स्थापना केली. जो काश्मीरमधील पहिला मुस्लिम राजवंश ठरला.
सुरुवातीच्या काळात या राजवटीत धार्मिक कट्टरता नव्हती. मात्र याच शतकाच्या अखेरीस शाह मीरचा वंशज सुलतान सिकंदर याने सत्ता हाती घेतली. तो धार्मिक बाबतीत अत्यंत आक्रमक आणि असहिष्णू म्हणून ओळखला जातो. त्याने हिंदू आणि बौद्धांची मंदिरे आणि मूर्ती मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त केल्या. म्हणूनच त्याला 'सिकंदर बुतशिकन' (म्हणजे मूर्तीभंजक) असे म्हटले जाऊ लागले. त्याने पहिल्यांदाच काश्मीरमधील गैर-मुस्लिमांवर 'जजिया कर' लादला. त्याच्या या अत्याचारी धोरणांमुळे अनेक हिंदूंनी काश्मीरमधून पलायन केले आणि ते हिमालयाच्या इतर भागांत जसे की जम्मू किंवा कांगडा येथे आश्रयाला गेले. याच काळात हजारो ब्राह्मणांना जबरदस्तीने किंवा परिस्थितीमुळे इस्लाम धर्म स्वीकारावा लागला.
सुफी संतांचा प्रभाव आणि सौम्य धर्मांतर
मात्र काश्मीरमधील धर्मांतराची प्रक्रिया केवळ जबरदस्तीनेच झाली असे नाही. यात सुफी संतांचाही खूप मोठा आणि महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यांची इस्लाम प्रसाराची पद्धत वेगळी, प्रेम आणि मानवतेवर आधारित होती. बुलबुल शाह हे काश्मीरमध्ये येणारे पहिले सुफी संत मानले जातात. त्यांच्या शिकवणीने प्रभावित होऊन लडाखचा एक बौद्ध राजा रिंचन याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. त्यानंतर इराणमधून आलेले मीर सय्यद अली हमदानी हे केवळ धर्मप्रचारक नव्हते, तर ते आपल्यासोबत पर्शियन कला आणि हस्तकलाही घेऊन आले. त्यांच्यामुळे काश्मीरमध्ये विणकाम, काष्ठशिल्प यांसारख्या कला विकसित झाल्या. त्यांच्या हजारो अनुयायांनी काश्मीरच्या कानाकोपऱ्यात जाऊन इस्लामचा प्रसार केला. सुफी संतांच्या शिकवणीत जात-पात मानली जात नसल्याने आणि समानतेचा संदेश असल्याने तत्कालीन समाजातील खालच्या स्तरातील लोकांनी मोठ्या संख्येने इस्लाम धर्म स्वीकारला. कारण त्यांना यात सामाजिक समानतेची संधी दिसली.
आणखी एक महत्त्वाचे सुफी संत होते शेख नुरुद्दीन वली, ज्यांना हिंदू लोक 'नंद ऋषी' या नावानेही ओळखतात. ते हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकतेचे प्रतीक बनले. त्यांचे अनुयायी दोन्ही धर्मांचे होते. त्यांच्या साध्या आणि मानवतावादी शिकवणीमुळे अनेक हिंदूंनी सहजपणे इस्लाम स्वीकारला.
काश्मिरी इस्लामचे वेगळेपण आणि आडनावांचे रहस्य
19व्या शतकातील प्रसिद्ध ब्रिटिश लेखक सर वॉल्टर लॉरेन्स यांनी त्यांच्या 'द व्हॅली ऑफ काश्मीर' या पुस्तकात काश्मीरमधील सुफी आंदोलनाचे सविस्तर वर्णन केले आहे. लॉरेन्स यांच्या मते, सिकंदर बुतशिकनसारख्या शासकांच्या कट्टरतेपेक्षा सुफी संतांच्या प्रेमळ शिकवणीमुळे आणि सामाजिक सुधारणेच्या आवाहनामुळे झालेले धर्मांतर अधिक प्रभावी ठरले. यामुळे काश्मीरमधील इस्लाम हा कट्टर स्वरूपाचा न राहता, त्यावर सुफी विचारांचा मोठा प्रभाव पडला. ज्याला 'काश्मिरी इस्लाम' असेही म्हटले जाते.
भारतात तो झेंडा फडकवणं गुन्हाच, रंग पाहून भडकू नका; छोट्या फरकामुळे होतोय गोंधळ
धर्मांतर केलेल्या ब्राह्मणांनी इस्लाम स्वीकारला असला तरी त्यांनी आपली मूळची आडनावे बदलण्यास नकार दिला. तत्कालीन मुस्लिम शासकांनाही त्यावर विशेष आक्षेप नव्हता. त्यामुळे धर्मांतरानंतरही बट (भट्ट), दर (धर), लोन, सोफी, रैना, पंडित यांसारखी मूळची काश्मिरी ब्राह्मण आडनावे आजही अनेक मुस्लिम कुटुंबांमध्ये कायम आहेत.
सांस्कृतिक धागे आणि ओळखीची जपणूक
आजही काही काश्मिरी मुस्लिम कुटुंबांमध्ये विवाहप्रसंगी हळदी लावणे किंवा मुलांचे नाव शुभ मुहूर्त पाहून ठेवणे यासारख्या काही हिंदू परंपरांचे अंश दिसून येतात. अनेक मुस्लिम कुटुंबे आजही त्यांच्या पूर्वजांच्या वंशावळ्या जपून ठेवतात आणि त्यांचे पूर्वज एकेकाळी काश्मिरी पंडित होते. हे ते आपल्या ओळखीचा एक भाग मानतात. धर्मांतर झाले असले तरी त्याबद्दल खंत न बाळगता ते सध्याच्या आपल्या धर्मावर पूर्ण श्रद्धा ठेवतात.
बौद्ध धर्माचे स्थित्यंतर
काश्मीर खोऱ्यात एकेकाळी बौद्ध धर्मही प्रचलित होता. पण तो शैव संप्रदायाच्या तुलनेत कमी प्रभावी होता. नंतर इस्लामच्या वाढत्या प्रभावामुळे आणि काहीवेळच्या कट्टरतेमुळे अनेक बौद्धांनी स्वतःला बहुसंख्य असलेल्या हिंदू धर्मात सामील करून घेतले किंवा ते काश्मीर खोऱ्यातून स्थलांतरित होऊन लडाख आणि तिबेटसारख्या हिमालयाच्या इतर भागांत गेले. याच कारणामुळे आज काश्मीर खोऱ्यात (श्रीनगर आणि आसपास) बौद्ध धर्मीय नगण्य आहेत. तर त्याला लागून असलेल्या लडाख प्रदेशात बौद्ध धर्म बहुसंख्याक आहे.
कसे, कुठे आणि कधी प्रत्युत्तर द्यायचे Indian Army ठरवेल: PM मोदी
अशा प्रकारे राजकीय स्थित्यंतरे, कधी धार्मिक कट्टरता, कधी सुफी संतांचा मानवतावादी प्रभाव, तर कधी सामाजिक समानतेची आकांक्षा अशा अनेक गुंतागुंतीच्या ऐतिहासिक आणि सामाजिक कारणांच्या एकत्रित परिणामामुळे काश्मीर खोऱ्याचे लोकसंख्याशास्त्रीय आणि सांस्कृतिक स्वरूप शतकानुशतके बदलत गेले.