गोव्यात नाईटक्लबला लागलेल्या आगीमुळं 25 जणांचा मृत्यू झालाय. ही आग लागण्याआधीचा व्हिडिओ समोर आलाय. या क्लबमध्ये नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आग लागली. हॉटेलमध्ये डान्स चालू असताना वापरल्या गेलेल्या 'फायर गन' किंवा 'फायर कँडल्स'मुळे ही आग लागली. हॉटेलचे डेकोरेशन लाकडी असल्याने आग वेगाने पसरली. आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर उपस्थितांची पळापळ सुरू झाली. नृत्य सुरू असताना स्टेजच्या पाठीमागे आगीचे लोळ उठल्याचं व्हिडिओतून पाहायला मिळतंय.
advertisement
किचन स्टाफला आग लागल्याच कल्पनाच नाही
हॉटेलचे किचन अंडरग्राउंड (तळघरात) होते आणि ते साऊंडप्रूफ असल्याने वरती लागलेल्या आगीची किंवा आरडाओरडा किचनमधील स्टाफला ऐकू आला नाही. किचनमध्ये जाण्यासाठी आणि येण्यासाठी जो जिना होता, तिथूनच आगीचा धूर खाली गेला. बाहेर पडायचा रस्ता बंद झाल्यामुळे आणि प्रचंड धुरामुळे कर्मचारी तिथेच अडकले.
संपूर्ण टीमचा मृत्यू
या दुर्घटनेत हॉटेलची संपूर्ण 'किचन टीम' चा मृत्यू झाला आहे. डिश वॉशरपासून ते सिनियर शेफपर्यंत सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला. आगीची सूचना देण्यासाठी कोणताही 'फायर अलार्म' वाजला नाही किंवा मॅनेजमेंटकडून खालील स्टाफला सांगण्यासाठी कोणीही गेले नाही.
मृत्यूचे कारण समोर
आगीत जळून नाही, तर धुरामुळे श्वास गुदमरून कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. नाका-तोंडातून रक्त येण्याइतपत त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. मृत्युमुखी पडलेले बहुतांश कर्मचारी तरुण (वय 18 ते 29 च्या दरम्यान) होते. काही जण तर दोन-तीन दिवसांपूर्वीच कामावर रुजू झाले होते.
25 जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू
गोवा दुर्घटनेतील मृत पावलेल्या 25 जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे .हे सर्व मृतदेह गोव्यातील बांबुळी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत. यातील सतीश राणा या युवकाची ओळख पटली असून तो उत्तराखंड येथील 27 वर्षाचा युवक असून याच नाईट क्लबमध्ये तो गेले सहा सात महिने कुक म्हणून कामाला होता. त्याचा मृत्यू हा ऑक्सिजन न मिळाल्याने गुदमरून झाल्याची माहिती त्याचा मित्र अनुराग गोसावी यांनी दिली आहे.त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचा भाऊ झारखंडहून रवाना झाला आहे.
