या घटनेचा एक नवीन व्हिडीओ समोर आला असून, त्यात आगीची भीषणता स्पष्टपणे दिसून येते. क्लबमध्ये सर्वत्र आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दिसत आहेत, तर काही लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. या हृदयद्रावक नाईट क्लब अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या सर्व २५ पीडितांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये क्लबचे २० कर्मचारी आणि ५ पर्यटकांचा समावेश आहे. या ५ पर्यटकांपैकी ४ जण हे दिल्लीचे होते, ज्यात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे.
advertisement
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पणजीपासून २५ किमी दूर असलेल्या अरपोरा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमध्ये सिलिंडरचा स्फोट झालाच नाही. तर इलेक्ट्रॉनिक फायर क्रॅकर जे डान्स आणि लाईव्ह शोसाठी लावण्यात आले होते, त्याची चिंगारी उडाली, ती छताला लागली आणि त्यामुळे आग पसरली. क्लबने अग्निशमन दलाकडून NOC देखील नव्हते, आग लागली तर त्यावर प्रतिबंध करण्यासाठी कोणतेही उपयायोजना नव्हत्या.सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या गंभीर दुर्घटनेनंतर गोवा सरकारने तातडीने कठोर कारवाई सुरू केली आहे. क्लबला २०२० मध्ये कामकाज सुरू करण्याची परवानगी देणाऱ्या तत्कालीन पंचायत संचालकांसह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना रविवारी निलंबित करण्यात आले आहे. तसेच, ज्या 'रोमियो लेन' कंपनीचा हा क्लब होता, त्या कंपनीच्या गोव्यातील दोन अन्य मालमत्ताही सील करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.
